मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना खोचक टीका
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तान आणि बांगलादेशींच्या विरोधात महामोर्चा काढला. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे आपण जशास तसे उत्तर देऊ असे म्हटले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर आणि मनसेच्या मोर्च्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे.
आपल्याला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेनेने कधीही झेंड्याचा रंग बदलला नाही अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आपल्या शेवटापर्यंत भगवा सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना आमदारांची रविवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या बैठकीत सीएए आणि एनआरसीबाबत शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीत सीएए आणि एनआरसी संदर्भात सर्व आमदारांना करण्यात मार्गदर्शन आले. सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमके काय आहे हे समजावून सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोकं म्हणत आहेत की, शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस सोबत गेल्यानं आम्ही हिंदुत्व सोडलंय, पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, एक माणूस एक झेंडा हे आमचे ठरलेले आहे. जगाला ठाऊक आहे आपले हिंदुत्व काय आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजन केंद्र उभारले जाणार आहे. जिल्ह्यातील आमदारांना सोबत घेऊन नियोजन करणार आहोत. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेने महामोर्चा आयोजित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही खोचक टीका केली.