पुणे – सासरे दागिने घालायला देत नाहीत म्हणून सुनेने बहिणीच्या मदतीने दागिने चोरले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सून आणि तिच्या बहिणीला ताब्यात घेतले आहे. हे दागिने सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे होते. याप्रकरणी एका 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस नाईक विनोद भोसले, पोलीस शिपाई ताम्हाणे व पवार यांनी कार्यवाही केली.
पोलीस तक्रारदार आण्णप्पा घोणसगी (85) यांच्या घरी गेले. त्यांना घोणसगी यांनी घरातील दोन्ही सुटकेसमधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगितले. पोलिसांनी चौकशी केली असता, घरामध्ये त्यांची सून आणि सुनेची बहीण दोघीच आल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी दोघींना ताब्यात घेऊन वेगवेगळी चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
सासरे दागिने घालण्यासाठी देत नव्हते म्हणून सुनेने बहिणीच्या मदतीने दागिने चोरल्याचे तपासात उघड झाले. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच दागिने चोरण्याचा कट रचून 14 ग्रॅम सोन्याचे दागिने एका छोट्या पिशवीत भरून ही पिशवी न्हानी घरात लपवून ठेवली होती. हे 5 लाख रुपयांचे दागिने घोणसगी यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने त्यांच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील दामिनी मार्शल शिंगाडे यांच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात आली.