नांदेड : नुकत्याच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये कॉंग्रेसला पराभव स्विकारावा लागला होता. त्यातच आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कॉंग्रेसने कंबर कसली असल्याचे दिसत आहे. कारण नांदेड जिल्ह्यासाठी आता विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम पार पडत आहे. मागील दोन दिवसांपासून या मुलाखती सुरू आहेत. त्यासाठी व्यासपिठावर आमदार सुभाष झांबडसह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नसल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघासाठी नुकत्याच मुलाखती झाल्या त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. विधानसभा निवडणूक लढण्याची कोणतीही प्रक्रिया मी पुर्ण केली नसून पक्षाकडे उमेदवारीदेखील मागितली नसल्याचे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच आपली निवडणूक लढण्याची इच्छा नाही परंतू, जर पक्षाने सांगितले तर आपण नक्की निवडणूक लढवू असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले.