मी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर नाही; निर्णय बदलणार नाही – राहुल

संग्रहित छायाचित्र

फेरविचार करण्याची पक्षाच्या खासदारांनी केलेली विनंती फेटाळली 
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्याचा निर्णय बदलण्याच्या मुडमध्ये नसल्याचे बुधवारी पुन्हा स्पष्ट झाले. राजीनाम्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी पक्षाच्या खासदारांनी केलेली विनंती त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.

मी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर नाही. मी माझा निर्णय बदलणार नाही, अशी परखड भूमिका त्यांनी मांडल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी 25 मे यादिवशी झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. मात्र, तो प्रस्ताव कार्यकारिणीने फेटाळला. त्यानंतरही राजीनाम्याच्या निर्णयावर राहुल ठाम आहेत. आता संसदेचे अधिवेशन चालू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने बुधवारी आपल्या लोकसभा खासदारांची बैठक बोलावली.

लोकसभेतील पक्षाची रणनीती निश्‍चित करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या त्या बैठकीला कॉंग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल हेही उपस्थित राहिले. बैठक सुरू होताच तामीळनाडूतील काही खासदारांनी राहुल यांना निर्णयाचा फेरविचार करण्याचे साकडे घातले. त्यासंदर्भात ठराव मंजूर करण्याचा आग्रहही त्यांनी धरला. ती भूमिका उचलून धरत बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच खासदारांनी राहुल यांना एकमुखी विनंती केली. मात्र, राहुल यांनी ती विनंती फेटाळल्याची माहिती सुत्रांनी दिली. नव्या अध्यक्षाच्या निवडीची व्यवस्था करावी, असे मी कॉंग्रेस कार्यकारिणीला आधीच सांगितले आहे. मात्र, त्यासंदर्भात अजून काहीच घडलेले नाही, अशी नाराजीही राहुल यांनी व्यक्त केल्याचे समजते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here