उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊ नये

वंचित बहुजन आघाडीची मागणी; ईव्हीएम विरोधाचे स्वागत, सभागृहात विषय लावून धरण्याचे आवाहन
आठही मतदारसंघात लढणार

आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करणार आहे. अनेक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क केला असून येत्या निवडणुकीत ताकदीचे उमेदवार देऊन अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असेही खंडाईत यांनी सांगितले.

सातारा – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशिनच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने खासदार उदयनराजेंनी ईव्हीएमच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर लोकशाहीच्या हितासाठी उदयनराजे वंचितची भूमिका उचलून धरत असतील तर त्यांना मनापासून धन्यवाद देणे आमचे नैतिक कर्तव्य आहे, असे आघाडीचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी सांगितले. उदयनराजेंनी ईव्हीएमच्या विरोधासाठी खासदारकीचा राजीनामा न देता हा विषय सभागृहात लावून धरावा, अशी मागणी खंडाईत यांनी केली.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खंडाईत म्हणाले, “”ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवा, या मागणीसाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे रेटा लावला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात कोणताही पक्ष अथवा नेता आक्रमक होताना दिसून येत नाही. अशावेळी उदयनराजेंनी ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेऊन अप्रत्यक्ष वंचितच्या लढाईत सहभाग दर्शविला, ही बाब स्वागतार्ह आहे, असे सांगून खंडाईत म्हणाले, “उदयनराजेंनी ईव्हीएमच्या विरोधासाठी खासदारकीचा राजीनामा न देता सभागृहात विषय लावून धरावा. जोपर्यंत ईव्हीएम हटावचा निर्णय होणार नाही तोपर्यंत सभागृहाच्या बाहेर पडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घ्यावा.’ त्याचबरोबर मुंबईत सध्या सुरू असणाऱ्या अधिवेशनात जाऊन आंदोलनात्मक एल्गार छेडावा, असे आवाहन खंडाईत यांनी केले. वंचितने ईव्हीएमच्या विरोधात राज्यभर घंटानाद करून कानठळ्या बसविल्या आहेत. त्याचबरोबर आयोगाला धारेवर धरले आहे.

लवकरच दिल्लीत ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करून सरकारला ईव्हीएमबाबत फेरविचार करण्यास भाग पाडले जाणार आहे. सातारा लोकसभेच्या निवडणुकीत वंचितने लाखाच्या पटीत मते घेतली आहेत. मात्र, ईव्हीएमने आमच्या समोर 40 हजाराचा आकडा ठेवलाय. वोट बॅक असणारा ओबीसी, मुस्लिम अशा सर्व समाजसमुहातील मतदार हा वंचितच्या सोबत होता, असे असताना ईव्हीएमने आम्हाला काही हजारांवर थोपवलय. हे पटण्यासारखे नसून मशिनव्दारे गडबड घोटाळा केला जातो, हे निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवाय, हा नारा बुलंद करण्यात येणार आहे, असेही खंडाईत यांनी शेवटी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.