“पुरंदर’साठी वाहतुकीच्या दृष्टीने काटेकोर नियोजन

पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतुकीच्या दृष्टीने, सामान्य प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या घटकांचा विचार पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाकडून (पुम्टा) करण्यात येणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचे वाहतुकीबाबतचे आराखडे एकत्र करुन “पुम्टा’कडून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला जाणार आहे. यानुसार मेट्रो, बीआरटी, रेल्वे आणि विमानतळ परिसरात सार्वजनिक वाहतुकीचे धोरण बनवण्यात येणार आहे. यामध्ये “पुम्टा’ समन्वयाची भूमिका बजावणार आहे.

पुणे आणि परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालणा देणे, वाहतूकविषयक विविध समस्या सोडवण्यासाठी “पुम्टा’ची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाची पहिली बैठक विधानभवनात नुकतीच पार पडली. त्यामध्ये पुरंदर येथील विमानतळावरील वाहतुकीबाबतही चर्चा करण्यात आली. विमानतळावर दळणवळणाची साधने, सामान्य प्रवाशांना विमानतळाकडे जाण्यासाठी आणि येण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या घटकांचा विचार “पुम्टा’कडून केला जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विमानतळ झाल्यानंतर प्रवाशांसह इतर घटकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, हे दोन्ही वेगळे भाग आहेत. विमानतळाकडे जाण्या-येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्याबाबत “पुम्टा’कडून विचार केला जाणार आहे.

प्रस्ताव राज्य सरकारकडे
पुरंदर विमानतळासाठी विशेष मार्ग तयार केला जाणार आहे. त्याकरिता चार रस्त्यांचा विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. हडपसर-बोपदेव घाट-सासवड रस्ता, उरूळीकांचन ते सासवड तसेच “पीएमआरडीए’ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येणारे प्रत्येकी एक असे दोन वर्तुळाकार मार्ग विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडले जाणार आहेत. या नियोजनाला आता “पुम्टा’कडून करण्यात येणाऱ्या वाहतूक आराखड्याचीदेखील जोड मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.