शिरूर- आजचा दिवस आनंदाचा आहे. ज्या मैदानात स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मी आहे. आमचे मित्र रसिकलाल धारिवाल यांचे चिरंजीव प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त निकाली कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. मात्र, मी प्रकाश धारिवाल यांच्यावर थोडासा नाराज आहे. कारण ते म्हणाले की, पवारसाहेब या वयातसुद्धा खूप वेळ स्पर्धेचा मोठ्या उत्साहात आनंद घेत आहे; परंतु मी काय म्हातारा झालेलो नाही, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगताच टाळ्या आणि एकच जल्लोष झाला.
माणिकचंद उद्योग समूहाचे उद्योगपती तथा शिरूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
राजकारणात असलो तरी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण आणले नाही, परंतु राजकारणात कोणता डाव कधी टाकायचा हे कुस्तीतून शिकल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिरूर येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजक अशोक पवार व येथील आमदार अशोक पवार व कार्यक्रमाच्या प्रमुख मी स्वतः शरद पवार त्यामुळे या ठिकाणी पवारांचे राज्य आहे का? अशी कोपरखळीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मारली. यावेळी हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते माजी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीबरोबर राष्ट्रीय पातळीवरील मल्लांच्या सहभागाने व त्याच्यातील रोमहर्षक लढतीने शिरूर येथील राष्ट्रीय कुस्त्याचे मैदान गाजले. यावेळी विठ्ठल मणियार, आमदार ऍड. अशोक पवार, उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल, दिनाभाभी धारिवाल, आदित्य धारिवाल, महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार, आयोजक माजी नगरसेवक अशोक पवार आदी उपस्थित होते.