Ramdas Athawale on Loksabha Election| रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) सर्वेसर्वा आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी एक नवा प्रस्ताव महायुती समोर ठेवला आहे. रामदास आठवले यांनी शिर्डी मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु ही जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या येथे सध्या शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. त्यावरून आठवले यांनी खासदार लोखंडेंना माझे राज्यसभेचे जे दोन वर्ष उरले आहेत, ते त्यांना द्यावेत आणि मला शिर्डी लोकसभा मतदारसंघात संधी द्यावी, असा प्रस्ताव रामदास आठवले यांनी महायुतीसमोर ठेवला आहे.
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले? Ramdas Athawale on Loksabha Election|
केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. “महायुतीमधील घटकपक्षांनी जागावाटपावरुन खेचाखेची करु नये. भाजप कोणताही पक्ष संपवायला निघालेला नाही. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री असताना मला चांगली संधी उपलब्ध होईल आणि शिर्डी संस्थानाला बळकट करण्यासाठी मी काम करेल,” असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
“मी लोकसभा निवडणूक लढवावी ही देशातील नागरिकांची इच्छा आहे. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे खासदार लोखंडेंना माझे राज्यसभेचे जे दोन वर्ष उरले आहेत, ते त्यांना द्यावेत आणि मला शिर्डी लोकसभा मतदारसंघात संधी द्यावी. शिर्डी मतदारसंघात बौद्ध समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 2009 नंतर या मतदासंघात बौद्ध समाजाला संधी मिळाली नाही. अनुसूचित जातीत बौद्ध समाजाची संख्या जास्त असल्याने उमेदवारी संदर्भात बौद्ध बांधवांच्या अपेक्षा असतील तर भाजपने याकडे लक्ष दिले पाहिजे,” असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
…तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही Ramdas Athawale on Loksabha Election|
दरम्यान, यापूर्वी महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा सोडली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आठवले यांनी नवा प्रस्ताव महायुती समोर ठेवल्याने याला मान्यता मिळणार की नाही? हे पाहावे लागणार आहे.