कानपूर – “तीन तलाक’ विषयीच्या कायद्याचे उल्लंघन करणारी घटना कानपूरमध्ये घडली आहे. सौदी अरेबियात राहणारा सलीम आपली पत्नी गुलसबा हिच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता. मग त्याची नजर गुलसबाच्या भुवयांवर पडली. सलीमने गुलसबाला “संमतीशिवाय थ्रेडिंग कसे केले’, असे विचारले. रागाच्या भरात त्याने तिला व्हिडीओ कॉल सुरु असतानाच “तिहेरी तलाक’ दिला आणि तिला वाटेल ते करण्यास मोकळी असल्याचे सांगितले.
आपल्या पत्नीने आपल्या संमतीशिवाय आयब्रोज अर्थात थ्रेडींग केल्याचे पती सलीमला समजताच त्याने व्हिडिओ कॉलवरच तिला घटस्फोट दिला. ही घटना 4 ऑक्टोबर रोजी घडली. आता पीडित महिला गुलसबाने पोलिस ठाण्यात जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आले. गुलसबाने पोलिसांना असेही सांगितले की, सासरचे लोक तिचा हुंड्यासाठी छळ करत होते.
पोलिसांनी गुलसबाच्या तक्रारीवरून मुस्लिम विवाह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुलसाबाचा विवाह प्रयागराज येथील मोहम्मद सलीमसोबत जानेवारी 2022 मध्ये झाला होता. मात्र गुलसाबाच्या पतीने किरकोळ कारणावरून तिला घटस्फोट दिला. पीडितेने पती, सासू आणि इतर सासरच्यांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. तिने पतीवर अत्याचार आणि हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला आहे. 2019 मध्ये देशात तिहेरी तलाक बेकायदेशीर आणि असंवैधानिक घोषित करण्यात आला होता, त्यानंतरही अशा घटना दररोज समोर येत आहेत.