Rajasthan – मणिपूरमधील एका चिटफंड कंपनीच्या घोटाळ्यात आरोपींची मालमत्ता जप्त न करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्याने मध्यस्थामार्फत 15 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राजस्थानच्या (Rajasthan) लाचलुचपत प्रतिबंध अधिकाऱ्याने ईडीचे अधिकारी (ED Officer) नवल किशोर मीणा (Naval Kishore Meena) याला सापळा रचून अटक केली आहे.
एसीबीने दलाल बाबूलाल मीणा याला 15 लाखांची लाच घेताना अटक केली. एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. मणिपूरच्या इंफाळमध्ये तैनात असलेले प्रवर्तन अधिकारी नवल किशोर मीणा पैशाची मागणी करत होते.
वल किशोर मीणा हे बस्सी, जयपूरचे आहेत आणि बाबूलाल मीणा हे देखील बस्सी येथील आहेत. या प्रकरणात बाबूलाल मध्यस्थ म्हणून काम करत होते. ते सध्या अलवरच्या खैरथल येथे कनिष्ठ सहाय्यक कार्यालय, सब रजिस्ट्रार म्हणून तैनात आहेत.
मणिपूरमधला एक चिटफंड घोटाळा ईडीने उघडकीस आणला होता. त्याचा तपास नवल किशोर आणि बाबुलाल करत होते. या प्रकरणातील एका आरोपी महिलेची प्रॉपर्टी अटॅच न करण्यासाठी नवल किशोर आणि बाबुलाल यांनी त्या महिलेकडे 15 लाख रुपयांची मागणी केली होती.
तसेच हे प्रकरण रद्द करण्याबाबतही बोलणी सुरु होती. दोन्ही अधिकारी जयपूरचे असल्याचे समजल्यावर पिडीत महिलेने राजस्थान एसीबीशी संपर्क साधला होता. त्यानंतर अलवार शहरामध्ये हा व्यवहार करण्याचे ठरवण्यात आले. त्यावेळी एसीबीने सापळा लावून नवल किशोर आणि बाबुलाल यांना 15 लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले.