इस्लामाबाद – सध्या तुरूंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आज खळबळजनक आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना त्यांच्या निवासस्थानीच करण्यात आलेल्या तुरूंगात कैद करण्यात आले असून तेथे त्यांना विषयुक्त अन्न दिले जाते आहे.
जर असे विषयुक्त भोजन केल्यामुळे बुशरा बिबी यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर असेल असा इशारा त्यांनी दिला आहे.आपल्या पत्नीला विष देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी न्यायाधीश नासिर जावेद राणा यांना सांगितले. बुशरा बिबी यांच्या त्वचेवर आणि जीभेवर विषाचा प्रभाव दिसू लागला आहे असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
इम्रान यांना सध्या अदियाला तुरूंगात ठेवण्यात आले आहे. तोशखाना प्रकरणासह भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. एक्स्प्रेस ट्रिब्युनने इम्रान यांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर त्यांच्या इस्लामाबाद येथील निवासस्थानातून तसेच रावळपींडी येथून सगळे नियंत्रित करत असल्यामुळे बुशरा यांना काही झाले तर केवळ तेच यासाठी जबाबदार असतील.
शौकत खानम इस्पितळाचे डॉ. असीम यांच्याकडून ४९ वर्षीय बुशरा यांची आरोग्य तपासणी केली जावी अशी मागणीही त्यांनी केली. या अगोदर ज्या डॉक्टरकडून बुशरा यांची तपासणी करण्यात आली आहे त्यांच्यावर आपल्याला आणि आपल्या पक्षाला विश्वास नाही. दरम्यान, इम्रान यांच्या विनंतीवरून न्यायालयाने त्यांना बुशरा यांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भात सविस्तर अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयातील आजच्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना बुशरा म्हणाल्या की त्या अमेरिकेच्या एजंट असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. एका लोकप्रिय टॉयलेट क्लिनरच्या माध्यमातून त्यांना विष देण्यात आले होते.