कराड – नांदलापूर, ता. कराड येथील पाचवड फाट्यासमोर माऊली गॅरेज जवळ किरकोळ कारणावरून तिघांनी मजुरी करणाऱ्या पती-पत्नीस लाथाबुक्यांनी व पाईपने मारहाण केली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सदाशिव अंकुश जमदाडे यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
रेखा अमृत राठोड, संगिता (पूर्ण नाव समजू शकले नाही), अमृत पोमा राठोड अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. यात अमृत राठोड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्यादी जमदाडे हे अमृत राठोड याच्याकडे चार महिन्यापासून मजुरीने कामाला आहे. पाचवड फाटा येथे टेलिफोनचे खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. त्याचे काम राठोड याने घेतले आहे.
बुधवारी रात्री फिर्यादी व रेखा राठोड यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. या कारणावरून चिडून जाऊन अमृत राठोड, रेखा राठोड व अमृतची सासू संगिता यानी आपसात संगणमत करून सदाशिव व त्याची पत्नीस लाथाबुक्यांनी व फायबरच्या पाईपने मारून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.