पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचा निर्णय होण्यापूर्वीच काहींनी स्व-उमेदवारी घोषित केली असली तरी सध्याच्या आऊटगोईंगच्या लिस्टमध्ये काही महत्त्वाच्या नेत्यांची नावे अग्रक्रमांकावर असल्याने हा प्रकार रोखण्याकरिताच नव्या चेहऱ्याला संधी देण्याचे धोरण राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अवलंबले जाण्याची दाट शक्यता आहे. याकरिता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर बैठक झडल्या असून चर्चेनुसार जिल्हातील दहाही मतदारसंघाकरीता नवे चेहरे शोधले जाणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस “आघाडी’करून विधानसभा लढणार, अशी गर्जना करण्यात आली होती. परंतु, भाजप आणि शिवसेनेकडून निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची “भरती’ सुरू केली आहे. या दोन्ही पक्षांतून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरू असल्याने तसेच भाजप-शिवसेनेनेही युतीचा निर्णय जाहीर केला नसल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही आघाडीबाबत सावध भुमिका घेतली जात आहे. त्यातही ज्या ठिकाणी जागांचा पेच निर्माण झाला आहे, अशा ठिकाणी जुन्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची धोरण अवलंबण्याच्या विचारात राष्ट्रवादी आहे, अशाच प्रकारचा पेच निर्माण झालेल्या मतदार संघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याने मोठ्या राजकीय उलाढाली घडणार आहेत.
विधानसभा जागा वाटपाचा सर्वस्वी निर्णय हा आघाडीच्या निर्णयावर अवलंबून असताना, यावेळी कोणत्याही परिस्थितीत आमदार व्हायचेचं, असा चंग बांधून कॉंग्रेसकडून आणि राष्ट्रवादीतील काही जणांकडून स्व-उमेदवारी जाहीर केली जात आहे. यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य काही भाजप मंत्र्यांशी असलेली अनेकांची जवळीक तसेच भाजपतील मातब्बरांशी असलेला संवाद आऊट गोईंगच्या दिशेने जावू शकतो का, याबाबत तर्क वितर्क लावले जात असल्याने अशा ठिकाणी तरूण इच्छुकांबाबत विचार केला जात आहे.
जिल्ह्यात काही संवेदनशील मतदारसंघापैकी भोर, इंदापूर, पुरंदर मानला जात असल्याने यावर राष्ट्रवादीकडून अधिकाधिक लक्ष दिले जात आहे.तेच तेच आणि जुन्या चेहऱ्यांना सातत्याने संधी दिली जात असल्याने पक्षातील बंडाळी वाढली असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उघडपणे स्पष्ट केले आहे, अशा स्थितीत राष्ट्रवादीकडून प्रत्येक मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याबाबतही सुतोवाच केले जात आहे. यानुसार इंदापुरातून सभापती प्रवीण माने यांचे नाव राष्ट्रवादीकडून आघाडीवर आले आहे.
भाजपशी असलेली जवळीक…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून इंदापूरसाठी यावेळी संभाव्य उमेदवार म्हणून आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना विविध पदांवर देण्यात आलेली संधी आणि विधानसभेसाठी नव्यांना संधी दिले जाण्याचे पक्षाचे ठरलेले धोरण यामुळे या मतदारसंघात ऐनवेळी कोणताही निर्णय जाहीर होऊ शकतो. त्यातही त्यांची भाजपशी असलेली जवळीकही पक्षाला खटकत असल्याने पक्षाकडून काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
आघाडीबाबत कॉन्फीडन्स नाही?
इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांनी संवादासाठी गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. तर, दि. 12 ऑगस्टला कॉंग्रेसचा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडीचा निर्णय होत नसल्याने हा मेळावा त्यांनी लांबणीवर टाकला आहे. दोन्ही पक्षांची आघाडी होणार की स्वबळावर लढणार? याच्या निर्णयाबाबत कॉन्फीडन्स नसल्यानेच शक्ती प्रदर्शनाचा मेळावा पाटील यांनी लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे.