“वुमेन्स हेल्पलाइन फाउंडेशन’च्या माध्यमातून शेकडो संसारांचा आधार

नीता परदेशी

नीताताईंचे प्राथमिक शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक आणि उच्च शिक्षण खासगी शाळा व महाविद्यालयात झाले. बीएससी होम सायन्समधून पदवी घेतली. आपण पोलीस अधिकारी व्हावे, अशी नीता परदेशी यांची आणि त्यांच्या आईचीही इच्छा होती. सर्व स्पर्धेत त्या सहभागी होत असल्या तरी महाविद्यालयात हॉलीबॉलपटू म्हणून त्या चांगल्या नावारूपाला आल्या होत्या. महाविद्यालयातील निवडणूकही त्यांनी जिंकली होती. एकत्र कुटुंब असले तरी परिस्थिती बेताची होती. महाविद्यालयातील अखेरच्या वर्षी त्यांचा विवाह झाला. मात्र आपण आणखी शिकावे आणि मोठे व्हावे ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. 1995 मध्ये लग्नानंतरही त्यांनी बीएड केले.

लग्नानंतर नीताताईंचे पती कामानिमित्त चिंचवडमध्ये आले. मात्र त्यानंतर 1998 मध्ये नीताताईंवर मोठा आघात झाला. त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. या आजारातून सावरण्यास त्यांना दोन वर्षाचा कार्यकाल लागला. नीताताईंमधील लढाऊ वृत्ती त्यांना शांत बसू देत नव्हती. 1999 मध्ये त्यांनी आपल्या समाजातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी रजपूत महिला मंडळ स्थापन केले. पत्नीसोबत राहून तिची देखभाल करण्यासाठी विजयसिंह परदेशी यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

2002 मध्ये त्यांनी घराजवळच परदेशी मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले. आजपर्यंत त्यांचा हा व्यवसाय अविरतपणे सुरू आहे. सध्या पती-पत्नी दोघेही हा व्यवसाय पाहतात. त्यांना दोन मुली असून एक मुलगी सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असून, दुसरी मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आपली आणखी शिक्षणाची भूक अजूनही शमली नसल्याचे त्यांनी सांगितले. 2017 मध्ये त्या एमएडची परिक्षा उत्तीर्ण झाले असून पुढील काळात पीएचडी करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

रजपूत महिला मंडळाचे काम करीत असताना त्यांची भेट तत्कालीन मंत्री कृपाशंकर सिह यांच्याशी झाली. त्यांच्या कामाच्या प्रभावातून त्या राजकारणाकडे वळल्या. त्यांनी कॉंग्रेस पक्षात पदाधिकारी म्हणून काम करण्यास सुरवात केली. मात्र कोणाच्या पुढे-पुढे करण्याचा स्वभाव नसल्याने त्या राजकारणात पुढे कधी आल्या नाहीत. त्यांनी आपले समाजकार्य सुरूच ठेवले. रेडझोनच्या प्रश्‍नांबाबत पिंपरी-चिंचवड शहरातील 40 नागरिकांना सोबत घेऊन दिल्लीत जाऊन यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांनीही दीड तास या प्रश्‍नाबाबत चर्चा केली. ही आपल्या आयुष्यातील “ग्रेट भेट’ असल्याचे नीताताई आवर्जून सांगतात.

दोन वर्षापूर्वी नीता परदेशी यांनी पीडित महिलांच्या मदतीसाठी “वुमेन्स हेल्पलाइन फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. मात्र या कामाला कोठून सुरवात करावी, याचा विचार त्या करीत होत्या. सुदैवाने त्यांच्या या कामाला उच्चशिक्षित महिलांचीही साथ मिळाली. वर्षभरापूर्वी खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. दोन वर्षांच्या कालखंडामध्ये वुमेन्स हेल्पलाइन फाउंडेशनकडे पाचशेहून अधिक तक्रारी आल्या. यामध्ये पती-पत्नीमधील भांडण, सासरकडील व्यक्‍तींकडून त्रास, बाल विवाह, रोडरोमिओंकडून दिला जाणारा त्रास यांचा समावेश होता. मात्र वुमेन्स हेल्पलाइनच्या रणराणिगींनी हे सर्व प्रश्‍न तडीस नेले आहेत. वेळप्रसंगी “वुमेन्स हेल्पलाइन’च्या महिला तक्रारदारही होतात. लोणी काळभोर एका अल्पवयीन मुलीचा लपून-छपून विवाह झाला.

मात्र त्याचदिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत संबंधितांना गजाआड केले. तसेच सांगलीत 30 वर्षांच्या पुरूषाशी 14 वर्षीय मुलीचे लग्न लावण्यात येत होते. तिची सुटका केल्यावर तिने नीताताईंना मिठी मारत आपल्या भावनांना वाट करून दिली. सांगवीत अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्यात आले. यावेळी वुमेन्स हेल्पलाईनकडून उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌यांची दखल महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली.

केवळ महिलांच्या तक्रारींचे निराकरण न करता त्यांना स्वावलंबी कसे करता येईल, याकडेही नीताताईंचे लक्ष आहे. 18 ते 20 ऑक्‍टोबर 2019 मध्ये त्यांनी रावेत येथे महिलांच्या व्यवसायांना चालना मिळवून देण्यासाठी “वुमेन्स शॉपिंग एक्‍सपो’ हा उपक्रम राबविला. यातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली. या “एक्‍सपो’मधून लाखो रुपयांची उलाढाल झाली. आपल्या या कार्याबद्दल बोलताना नीताताई म्हणाल्या की, “सामाजिक क्षेत्रात काम करताना मला माझ्या स्वभावात बदल करावा लागला. पूर्वी माझा रागीट आणि कडक स्वभाव होता. मात्र आता महिलांच्या समस्या सोडविताना त्यांच्या कुटुंबाशी सौजन्याने वागावे लागते. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने तक्रारीची दखल घेतली नाही तर राग येतो.

मात्र, रागीटपणाने न वागता आपले म्हणणे वरिष्ठांसमोर मांडून संबंधित महिलांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. महिलांच्या समस्या कोणत्या वेळेला येतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे रात्री-अपरात्रीही जावे लागते. मात्र आमच्या हेल्पलाइनच्या सदस्यांची चांगली साथ मिळत असल्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास आम्ही समर्थ असतो. वुमेन्स हेल्पलाइन फाउंडेशनचे काम प्रत्येक जिल्ह्यात पोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

आमच्या संस्थेचे एक कॉल सेंटर असावे. आमच्या कामातून निर्माण होणाऱ्या आदरयुक्‍त भीतीतून, वुमेन्स हेल्पलाइनच्या कामातून अधिकाऱ्यांनी पीडित महिलांच्या समस्या सोडाव्यात, अशी इच्छा आहे आणि आम्ही त्यात नक्‍कीच यशस्वी होऊ.’ पीडित महिलांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास त्यांनी 9822001950 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

समाजात वावरताना “मला कसलीच अडचण, तक्रार नाही, असं म्हणणारी एकही महिला तुम्हाला आढळणार नाही. वेगवेगळ्या वयोगटातील महिलांच्या समस्याही निरनिराळ्या असतात. त्यातही विवाहित महिलांच्या अनेक अडचणी असतात. जरा काही खुट्‌ट झाले की नवऱ्याकडून “घटस्फोट’ची बंदूक ताणली जाते. काहीजणी आपल्यासमोरील अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजणी निमूट अन्याय सहन करत राहतात. काहीजणींना मदतीची अपेक्षा असते. कुणीतरी आपला विस्कटलेला संसार पुन्हा सुरळीत करून द्यावा… मोडलेला संसार जोडून द्यावा, अशा विवंचनेत बऱ्याच स्त्रिया असतात. अशावेळी “वुमेन्स हेल्पलाइन’ची त्यांना मोठी मदत होते. महिलांच्या सर्व समस्या सोडवून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या संस्थेकडे आत्तापर्यंत पाचशेहून अधिक पीडित महिलांच्या तक्रारी आल्या आहेत. यापैकी 90 महिलांचे संसार वाचविण्यात “वुमेन्स हेल्पाइन’ला यश आल्याचे संस्थेच्या अध्यक्ष नीता विजयसिंह परदेशी या अभिमानाने सांगतात.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.