पुणे- थैमान घालणाऱ्या करोना विषाणूने मागील महिनाभरात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण असे मिळून तब्बल 102 जणांचा बळी घेतला आहे. या परिस्थितीमळे पुण्यातील चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे.
दि.30 एप्रिल ते 15 मेदरम्यान राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग दिवस-रात्र काम करत आहे. मागील महिनाभरापासून शहर आणि जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णसंख्या 1 हजार 828 झाली आहे. त्यामध्ये एकट्या पुणे महानगरापालिका हद्दीत 1 हजार 700 च्या पुढे बाधित संख्या आहे.
त्याबरोबर मृतांची संख्याही पुणे महानगरपालिका हद्दीतच अधिक आहे. 30 मार्च रोजी शहरात पहिला करोना बाधित रुग्णाचा नायडू रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर 2 एप्रिल रोजी दुसरा मृत्यू झाला आणि शहरात मृत्यूचा कहर सुरू झाला. त्यामध्ये दि. 7, 8 आणि 23 एप्रिल रोजी सर्वाधिक प्रत्येकी 8 जणांचे मृत्यू झाले. त्यामुळे पुण्यात आरोग्य विभागासह प्रशासन चांगलेच हादरले. दि.30 एप्रिल रोजी 6 जणांचा मृत्यू झाला. तर 9, 12, 14, 15, 25 एप्रिल आणि 1 मे रोजी प्रत्येकी पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
सर्वाधिक मृत्यू ससूनमध्ये
ससून रुग्णालयात सर्वाधित मृत्यूची नोंद असून, आतापर्यंत मृत्यू झालेल्यामध्ये एकट्या ससून रुग्णालयात 68 बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर पुणे महानगर पालिकेकडे 27 असे एकूण 95 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये सिम्बॉयसिस, नायडू, भारती हॉस्पिटल, वायसीएम, जहांगीर, ईनलेक्स बुदराणी, सह्याद्री, एएफएमसी, दीनानाथ मंगेशकर, पूना हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयात करोनाच्या बळींची नोंद झालेली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील करोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे.