पुणे – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पुणे शहर “रेड झोन’ असल्याने येथून बाहेर जाण्यासाठी परवानगी मिळणार की नाही? त्यावर जिल्हाधिकारी काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. केवळ शहरातील “ग्रीन झोन’ असलेल्या भागातील नागरिकांना गावी जाण्याची परवानगी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पुण्यात फक्त कोथरूड-बावधन आणि औंध- बाणेर हे दोन झोन सोडले तर अन्यत्र बाधितांची संख्या वाढते आहे. अशा परिस्थितीत येथील नागरिकांना दुसऱ्या गावी, जिल्ह्यात पाठविणे योग्य नाही, अशीही चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी मिळालेल्या सूचनेनंतर नागरिकांनी मोठ्या संख्येने अर्ज ईमेल केले आहेत.
त्याबाबत तलाठी कार्यालयाकडून माहिती मागवली जात आहे. मात्र, पुणे शहर रेडझोनमध्ये असल्यामुळे हा नियम शहराला लागू नाही. त्यामुळे केवळ शहरातील ग्रीन किंवा ऑरेंज झोन असलेल्या भागातील नागरिकांनाचा बाहेरगावी किंवा जिल्ह्यात जाण्याची परवानगी मिळू शकेल. त्याबाबत प्रशासन निर्णय घेणार असून, सध्या पुण्यात परराज्यातील किती कामगार, मजुर अडकले आहेत, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातून गावी जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू यांनी ऑनलाइन अर्ज करावा. पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या हद्दीतील अर्जावर संबंधित नोडल अधिकारी हे निर्णय घेतील. असा निर्णय घेताना मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू व अन्य व्यक्ती यांची यादी पोलीस उपायुक्त, जिल्हाधिकारी, यांच्यामार्फत ते ज्या जिल्ह्यात अथवा राज्यात जाणार आहेत, तेथील जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळवतील व त्यानंतरच पास देण्यात येईल.
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे
तात्काळ परवानगीचे अधिकार पोलीस आयुक्तांना
पुण्यातून बाहेरगावी जाण्यासाठी कोणालाही परवानगी मिळू शकत नाही. मात्र, वैद्यकीय कारणास्तव पोलीस आयुक्त तात्काळ बाहेरगावी जाण्याची परावनगी देऊ शकतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती देणे बंधनकारक आहे. त्याबाबत पोलिसांकडे अर्ज केल्यावर, त्या अर्जातील माहिती आणि कागदपत्र तपासणीनंतर आयुक्तांकडून परवानगी मिळू शकेल.