पुणे – एका बाजूला शहरात पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने पालिकेने या क्षेत्रीय कार्यालयावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसऱ्या बाजूला शहरात आणखी 3 नवीन हॉटस्पॉट विकसित होत आहेत. येथील रुग्णांचे आकडे सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर करोना नियंत्रणाचे कडवे आव्हान आहे.
शहरातील करोनाबाधितांचा आकडा 1,700 वर पोहचला आहे. यात सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ, शिवाजीनगर, कसबा- विश्रमाबागवडा, ढोले पाटील रस्ता आणि येरवडा- धानोरी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहेत. त्यामुळे आता हे हॉटस्पॉट नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, त्याच वेळी आता शहराच्या उपनगरांत करोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसांत धनकवडी हद्दीत रुग्ण संख्या 121 झाली आहे. त्याच वेळी वानवडी-90, तर नगररस्ता आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रुग्णसंख्या 50 च्या घरात गेली आहे.
मागील 14 दिवसांपूर्वी (18 एप्रिल) विचार करता धनकवडी-32, हडपसर-23, नगर रस्ता-6, वानवडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 32 रुग्ण होते. तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 23 रुग्ण होते. म्हणजेच गेल्या 14 दिवसांत चार ते पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत वाढणारी रुग्णसंख्या पालिकेसाठी चिंतेची बाब बनली असून, याकडे वेळीच लक्ष न दिले गेल्यास शहरात या साथीला अटकाव घालणे आणखी कठीण होणार आहे.