राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात सोमवारी (दि. 29) 12 जण करोना पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्याने शंभरी पार केली आहे. तालुक्यातील संख्या 103वर पोहोचली आहे.
सोमवारी चाकणची राक्षेवाडी (3), खराबवाडी (3), वडगाव घेनंद (1), राजगुरूनगर (2), चऱ्होली (1), नाणेकरवाडी (1), चाकणचे बालाजीनगर (1) अशा 12 जण बाधित झाले आहेत, अशी माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली. दरम्यान, गेल्या चार दिवसांत 45 बाधित आढळून आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात करोनापासून दूर राहणाऱ्या खेड तालुक्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रुग्णांच्या संख्येत झापाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, राजगुरूनगर शहरात दररोज मोठी गर्दी होत आहे. खेड पोलिसांच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. मात्र, अनेक नागरिक दाद देत नाहीत.
चाकण उद्योगनगरीत करोनाची वाटचाल
खराबवाडी येथिल एका खासगी कंपनीमध्ये सोमवारी (दि. 29) 6 कामगार करोना पॉझिटिव्ह सापडल्याने उद्योग नगरीकडे करोनाने वाटचाल केली आहे. यापूर्वी एका खासगी कंपनीत काही कामगारांना करोना झाला होता; मात्र ते बरे होऊन घरी परतले असतानाच पुन्हा एका कंपनी सहा जण करोना पॉझिटिव्ह सापडल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. या खासगी कंपनीत काम करणारे बालाजीनगर, मोशी, रहाटनी, व भोसरी येथील प्रत्येकी एक तर चिंचवड येथे राहणाऱ्या दोन कामगारांना करोना समावेश असून बालाजीनगर सोडाला तर बाकिच्या पाच जणांची पिंपपरी-चिंचवडमध्ये नोंद झाली आहे.