जिल्हाधिकारी : डॉक्टरांसह आढावा बैठक
पुणे – जिल्ह्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी करोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी. रुग्णांना मानसिक आधार देऊन वैद्यकीय सेवेविषयी विश्वास निर्माण करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.
करोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय रुग्णालय व प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. साखर आयुक्त सौरभ राव, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ. संजय देशमुख, डॉ. अशोक नांदापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोविडची तपासणी करण्याची व्यवस्था आहे, तेथे कोविडच्या रुग्णांना भरती करण्यासाठी आदेश द्यावेत. शासकीय व खासगी प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड-19 नमुने तपासणीसाठी येतात. त्यांचा तपासणीचा अहवाल वेळेत द्यावा. प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. मनुष्यबळ, आवश्यक यंत्रणा, साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी.
साखर आयुक्त राव म्हणाले, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामे करावीत आणि काही अडीअडचणीबाबत तत्काळ प्रशासनास माहिती सादर करावी.