हो, माणुसकी अजूनही जिवंत आहे. लॉकडाऊनदरम्यान पोलिस बंदोबस्त करताना याचा प्रत्यय आला. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून आम्ही शाहूपुरी पोलिस ठाण्यात बंदोबस्तासाठी आहोत. सध्या खूप ताण आहे, धावपळ आहे. घरचं सगळं संभाळून नोकरी करणं या काळात कठीण आहे. मात्र, घरापेक्षा पुढे आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करणे हे पहिले कर्तव्य आहे. सातारा शहरालगत असलेल्या शाहूपुरी येथील भाग्यराज पेट्रोल पंप येथे मला ड्युटी होती. दोन दिवस माझी तब्येत ठीक नसल्याने मला खूप अशक्तपणा आला होता.
एक शब्दही बोलण्याची ताकद नव्हती. चक्कर आल्यासारखे होत होते. काही सुचेना म्हणून फॅमिली डॉक्टरांना फोन केला व तब्येतीबद्दल सांगितले. डॉक्टरांनी मला जवळच्या मेडिकलमध्ये जाऊन फोन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी समोरच सुुजाता फार्मा या मेडिकलमध्ये जाऊन डॉक्टरांना फोन करून मेडिकलमध्ये असणाऱ्या गृहस्थांकडे दिला. डॉक्टरांनी त्यांना फोनवरुनचं काही औषधे सांगितली. त्यांनी मला “तुम्ही स्वत पेशंट आहात का,’ असे विचारले.
मी हो म्हणताच ताबडतोब मला शक्तिवर्धक पेय दिले व लगेच प्यायला सांगितले. इतर औषधे देईपर्यंत मी पैसे काढून काऊंटरवर ठेवले. परंतु, त्या सदगृहस्थाने औषधांबरोबर पैसेही मला परत दिले. एनर्जी ड्रिंक व औषधे कसलेही पैसे घेतले नाहीत. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी दाखविलेली माणुसकी मला निःशब्द करुन गेली. आपणा सर्वांना विनंती करते की, घरात राहा तरच तुम्ही सुरक्षित राहाल. तुमचे घरात थांबणे हेच प्रशासनाला खूप मोठं सहकार्य असेल.
– सौ.शुभांगी उद्धव पवार, (भरोसा सेल, सातारा पोलीस दल)