भोर – नेरे (ता. भोर) येथे करोनाचे दोन रुग्ण आढळल्याने नेरे व परिसरातील गावचे नागरिक करोना दहशतीखाली आहेत. शासना नेरे गांव रेड झोनमध्ये जाहीर केला आहे. अशा बिकट प्रसंगी नेरे व परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही. सर्वांना गावांमध्येच आरोग्यसेवा पुरवली जाईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच घरातच थांबूनच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे.
नेरे गावाला आमदार थोपटे यांनी मंगळवारी (दि.21) भेट देऊन येथील नागरिकांची विचारपूस करून शासनाने करोना रुग्ण सापडल्यानंतर केलेल्या कामांचा आढावा आमदार थोपटे यांनी घेतला. यावेळी तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, अनिल सावले, अभिषेक येलगुडे व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
नेरे गावामध्ये मंगळवारी (दि.14) भोर तालुक्यातील पहिला तर शुक्रवारी (दि. 17) दुसरा करोना बाधित रुग्ण आढळला असून भोरच्या प्रशासनाने 19 नागरिकांना होम क्वारंटाइन केले असल्याची माहिती यावेळी तहसीलदार अजित पाटील, गट विकास अधिकारी विशाल तनपुरे, व तालुका वैद्यकीयअधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
आमदार थोपटे यांनी नेरे व परिसरातील गावांमध्ये स्वस्त धान्याचा होणारा पुरवठा याबाबत माहिती घेतली. तसेच ज्या नागरिकांना रेशनकार्ड नाहीत अशा नागरिकांची यादी तयार करून त्यांना तात्काळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल. ज्यांचे हातावर पोट आहे अशा नागरिकांना साहित्य दिले जाईल; परंतु नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. करोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाय योजना तसेच नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचा पुरवठा केल्याबाबतची माहिती स्थानिक प्रशासानने यावेळी आमदार संग्राम थोपटे यांना दिली.