बंगळुरू – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी याही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. अर्थात, त्यांचा सहभाग कर्नाटकपुरताच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रा सध्या केरळमध्ये आहे.
ती यात्रा 30 सप्टेंबरला कर्नाटकात दाखल होईल. काही दिवस ती यात्रा कर्नाटकमधून मार्गक्रमण करेल. त्यादरम्यान सोनिया आणि प्रियंका स्वतंत्र दिवशी यात्रेत सहभागी होतील, अशी माहिती कॉंग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी शुक्रवारी दिली. सोनिया आणि प्रियंका यात्रेत सहभागी झाल्यास कर्नाटक कॉंग्रेसचा उत्साह आणखी वाढू शकतो.
कर्नाटकमध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपला कडवी टक्कर देण्याचा निर्धार कॉंग्रेसने केला आहे. अशात भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याची योजना कॉंग्रेसने आखल्याचे सूचित होत आहे.