ओझर – जुन्नर तालुक्यात दिवसभर तापमानाचा पारा वाढल्याने तप्त उन्हामुळे पिकांना पाणी देण्याच्या पाळीमध्ये वाढ झाली आहे यामधूनच उगवून आलेल्या पालेभाज्या करपताना दिसत आहेत. पिकांना रात्रीचे पाणी द्यावे तर बिबट्याची भीती व दिवसा पाणी द्यावे तर वीज नाही व त्यातून उन्हाचा तडाखा अशा परिस्थितीत शेतकरी अडकला असून पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला आहे. शेतातील फळे भाज्यांवरच पैसे मिळवून शेतकरी येणारा दसरा-दिवाळी सण साजरा करणार आहे; मात्र ही पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.
जुन्नर तालुक्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा सर्वत्र जाणवू लागला असून याचा परिणाम शेतकरी, शेती कामे करणाऱ्या मजूर वर्गांबरोबरच सर्वसामान्यां देखील होऊ लागला आहे. ओतूर, ओझर, आळेफाटा आणि अणे परिसरात उन्हाचा तडाखा जास्त प्रमाणात आहे. उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट आहे. जुन्नर तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
आज मीतिला शेतामध्ये पिकांच्या खुरपण्या बरोबर इतर कामे सुरू असल्यामुळे याचा त्रास मजूर वर्गास सर्वाधिक होत असल्याने शेतामधील कामे सकाळच्या प्रहरात उरकून घेण्यावर अधिक भर आहे. दुचाकीवर प्रवास करणारे नागरिक वाढत्या उष्णतेमुळे डोक्यावर टोपी, डोळ्यांवर गॉगल व तोंडाला रुमाल बांधूनच प्रवास करीत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे फॅन, एसी व कुलर या साधनांच्या वापरामध्ये वाढ झाली आहे.
रुग्णसंख्येत वाढ
सकाळच्या प्रहरात थंडी, दुपारच्या प्रहरात उष्णता असा प्रकार सुरू झाल्याने लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही सर्दी, पडसे, खोकला ताप यासारख्या आजारांचा त्रास होऊ लागला आहे. परिणामी रुग्णसंख्येत वाढवून दवाखान्यांमधून गर्दी होत आहे.