मुंबई – आपल्या देशामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तयार केल्या जात आहेत. त्यामुळे आपली फसवणूक होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला आपल्याला सामोरे जावे लागते. अशा प्रकरणांतून वाचण्यासाठी आपण देखील तितकंच सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे बनावट नोटा कश्या ओळखाव्यात आणि होणारे आर्थिक नुकसान कसे टाळावे याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….
वॉटर मार्क तपासा –
भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्या फोटोचा वॉटर मार्क (चिन्ह) असतो. हा वॉटर मार्क नेहमी नोटेच्या डाव्या बाजूला असतो. या वाटरमार्क वर आपण प्रकाश पडल्यावर तो स्पष्टपणे दिसू लागतो.
सुरक्षा धागा तपासा –
आपल्या भारतीय नोटांवर एक विशिष्ट धागा असतो. ज्यावर ‘आरबीआय’ असे लिहिलेले असते. या शिवाय नोटेचे मूल्य देखील छापलेले असते.
मुद्रण गुणवत्ता तपासा –
भारतीय चलन हे उच्च प्रतीच्या छपाई यंत्रामार्फत छापले जाते. त्यामुळे यामध्ये काही तीक्ष्ण रेषा देखील पाहायला मिळतात. या दोन्ही गोष्टी नसलेल्या नोटा बनावट आहेत असे समजले जाते.
सी-थ्रू रजिस्टर तपासा-
आपल्या भारतीय चालनी नोटांमध्ये एक सी-थ्रू रजिस्टर असते. हे नोटेच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला छापलेल्या मूल्याची प्रतिमा असते. यावर प्रकाश टाकल्यास ती प्रतिमा स्पष्टपणे दिसते.
नोटेवरील सूक्ष्म अक्षरे तपासा-
भारतीय चलनी नोटांमध्ये काही ठराविक सूक्ष्म अक्षरे पाहायला मिळतात. त्या अक्षरांची रचना अत्यंत तीक्ष्ण आणि अचूक स्वरूपात केलेली असते. भिंगाच्या साह्याने आपण जर बघितलं तर ती अक्षरे स्पष्ट दिसून येतात.
नोटेवरील सिरीयल नंबर तपासा –
भारतीय चलनातील प्रत्येक नोटेवर एक सिरीयल नंबर दिलेला असतो. नोटेच्या दोन्ही बाजूंना हा एकच नंबर पाहायला मिळतो. बाजूच्या पॅनेलवर छापलेल्या क्रमांकाशी हा नंबर अचूकपणे जुळत असतो. दरम्यान, या सर्व गोष्टींची मदत घेऊन आपण बनावट नोटा ओळखू शकतो आणि होणारे आर्थिक नुकसान टाळू शकतो.