संगमनेर -करोनाचे संकट मार्च महिन्यात घोंघावू लागले, तसे देशाला लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. नोव्हेंबर महिन्यापासूनच गणेश मूर्ती निर्मितीच्या कामाला लागलेल्या गणेश मूर्ती कारखानदार आणि कारागीर यांना सुरुवातीला लॉकडाऊन आणि आता सरकारच्या नियमावलीमुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात मूर्तींना मागणीच नसल्याने गुंतवलेले भांडवल निघणार कसे आणि कारागिरांना पगार द्यायचा कसा? अशी चिंता त्यांना सतावत आहे.
सुखकर्त्या गणेशाचे आगमन एका महिन्यावर येऊन ठेपले आहेत. मात्र, गणेशमूर्ती कारखान्यात स्थानिक आणि विविध जिल्ह्यांतून येणारे ठोक मूर्ती ग्राहक, तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते येतच नसल्याने अद्यापही शांतता आहे. करोनाच्या संकटात घाबरलेला ग्राहक सरकारच्या नियमावलीमुळे अजूनही कारखान्यांकडे वळत नसल्याचे चित्र आहे. मात्र, यामुळे मूर्ती कारखानदार हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. प्रत्येक गणेश मूर्ती कारखान्यात किमान 5 ते 10 कारागीर असतात.
संगमनेरमध्ये वाघापूर येथे मूर्ती बनवणारा कारखाना आहे. याठिकाणी जोर्वेकर कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय असल्याने करोनाच्या संकटात भांडवल तर सोडाच. पण कामगारांना रोजंदारी देण्यासाठी सुद्धा पैसे मिळतात की नाही, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. त्यामुळे मजुरी देतील की नाही या शंकेने येथील कारागीरही धास्तावलेले आहेत. सरकारने या परिस्थितीत आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा कारागिरांना आहे.
करोनाचे संकट येण्यापूर्वीच कारखाने सुरू झाले होते. मात्र, आता तयार झालेल्या या मूर्ती विकल्या जातील की नाही, अशी भीती वाटत असल्याने मूर्ती झाकून ठेवाव्या लागल्या आहेत. तसेच दरवर्षी मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात 20 ते 30 टक्के वाढ होते. मात्र, मूर्तींची किंमत ही चार-चार वर्षे मागणी अभावी आहे तीच ठेवावी लागते.
यंदा सरकारने सार्वजनिक मंडळे आणि भक्तांना केलेल्या आवाहनामुळे अनेकांचा कल प्रतिमा पूजन किंवा धातूच्या मूर्ती पूजनाकडे असल्याने गुंतवलेले भांडवल वसूल होऊन कारागिरांच्या मेहनतीचे पैसे तरी देता येतील की नाही, ही काळजी कारखानदारांच्या आणि कारागिरांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
सरकारच्या निर्णयामुळे बनविलेल्या मोठ्या गणेश मूर्ती तशाच झाकून ठेवाव्या लागल्या. दरवर्षी जिल्ह्याबाहेरील व्यापारी मूर्ती खरेदीसाठी येतात. परंतु या वर्षी अजूनही ते संपर्क करत नसल्याने आतापर्यंत केलेली गुंतवणूक वसूल होते की नाही, तसेच कारागिरांनाही पगार कसा करावा, हा प्रश्न आमच्या समोर उभा ठाकला आहे.
संदीप जोर्वेकर , गणेश मूर्तिकार