पुणे- बांधकाम परवानगीसाठीची कार्यपद्धतीची नागरीकांना माहिती व्हावी, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (पीएमआरडीए) मुळशी तालुक्यातील घोटावडे येथे नागरिकांची कार्यशाळा घेतली.
गेल्या काही वर्षात परवानगी न घेताच बांधकाम करण्याच्या वाढलेल्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन पीएमआरडीएकडून प्रथमच करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्राधिकरणाच्या उपनियंत्रक अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग तथा उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, तहसीलदार मनीषा तेलभाते, बजरंग चौगुले, सहाय्यक नगर रचनकार ऋतुराज जाधव घोटावडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मोनिका सिंह यांनी ग्रामस्थांना अनधिकृत बांधकाम न करता परवानगी घेऊनच बांधकाम करण्याचे आवाहन केले. तसेच अधिकृत बांधकामाचे फायदे यांची माहिती दिली. तसेच बांधकाम विकसन परवानगी घेणेची कार्यपद्धती, अनधिकृत बांधकाम म्हणजे काय, अनधिकृत बांधकामाचे तोटे, गुंठेवारीचे नियम इत्यादीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने घोटावडे व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.