कशी आणणार गुंतवणूक? ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे!

आशिष शेलार यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : राज्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने आणल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यातून अडीच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. या मुद्द्यावरूनच भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारला काही प्रश्‍न विचारले आहेत. यात त्यांनी, 2 लाख 50 हजार नवे रोजगार आणि 61 हजार कोटींची गुंतवणूक? हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग? आधी हे सांगा… आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना पगार कधी देणार? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार? वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार? बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले? निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना मदत कधी मिळणार? उध्दवस्त पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार? आरोग्य सेविका, कोविड योद्धे यांना मानधन कधी मिळणार? शाळांची फी कपात करुन पालकांना दिलासा कोण देणार?, अशाप्रकारे आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच, सत्तेचा मटका अन्‌ खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे!, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला.

दरम्यान, सह्याद्री अतिथीगृह येथे हे सर्व सामंजस्य करार करण्यात आले. 61 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून 2 लाख 53 हजार 880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. या वेळी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे मंत्री व अधिकारी उपस्थित होते. करोनाचे संकट असतानाही राज्याच्या उद्योग विभागाने कमी कालावधीत दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा समाधान, अभिमान वाटेल असा क्षण आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री देसाई आणि त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.