पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी युवा उद्योजक पुनीत बालन यांची सदिच्छा भेट घेतली. पुनीत बालन हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख आहेत. मोहोळ यांनी घेतलेली पुनीत बालन यांच्याशी भेट ही राजकीय दृष्टीकोनातून देखील महत्त्वाची आहे.
पुनीत बालन यांचे सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रांत मोठे काम आहे. पुण्यातील बहुतांश गणपती मंडळे, नवरात्र मंडळे, ढोल-ताशा पथकांसोबत बालन यांची नाळ जोडली गेली आहे. युवा वर्गातही बालन यांचे लाखो चाहते आहेत. इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून पुनीत बालन यांनी अनेक शाळा, महाविद्यालयांना मदत केलेली आहे.
तर हजारो कुटुंबातील मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येते. करोनाकाळात योद्धा म्हणून मुरलीधर मोहोळ आणि पुनीत बालन यांनी सोबत काम केले आहे.
पुण्याची लोकसभा निवडणूक ही तिरंगी होणार असली, तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत आहे. पुनित बालन ग्रुपतर्फे दरवर्षी पुण्यातील नामांकित गणपती मंडळे, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या “फ्रेंडशिप करंडक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
त्याला देखील खूप मोठा प्रतिसाद मिळतो. फ्रेंडशिप करंडकाशी हजारो तरुण जोडले गेलेले आहेत. ते सर्व तरुण पुनीत बालन यांचे चाहते आहेत. यावेळी मोहोळ आणि बालन यांच्यात सध्याच्या राजकीय स्थितीबद्दलही चर्चा झाली.