पॅरिस -सर्बियाचा अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचने रविवारी फ्रेंच ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकताना विक्रमी 23 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपदही पटकावले. मात्र, आता त्याच्याबाबत एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या छातीवर एक रुपेरी रंगाची नॅनो टेक्नॉलॉजी चीप बसविण्यात आल्याचे समोर आले आहे. याला जागतिक टेनिस महासंघाने परवानगीच कशी दिली, असा सवाल आता चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
नॉर्वेच्या कार्लोस अल्कराझला पराभूत करत फ्रेंच स्पर्धा जिंकल्यावर जोकोविचने जेव्हा आपला टी-शर्ट काढला तेव्हा सगळ्यांचेच लक्ष त्याच्या छातीवर लावलेल्या रुपेरी रंगाच्या स्टिकरकडे वेधले गेले. त्यावर त्याने स्वतःच याबाबत माहिती दिली. लहानपणापासून मला आर्यनमॅन आवडायचा व आपणही त्याच्यासारखीच छातीवर एक अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त चीप बसवायची व अशक्यप्राय कामगिरी करायची, असे स्वप्न पहायचो.
या चीपमध्ये असलेले तंत्रज्ञान आपली शारीरिक, मानसिक व क्रीडा क्षमता वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडत आहे. इटलीच्या एका कंपनीने ही चीप तयार केली असून, ती केवळ छातीवर स्टिकरप्रमाणे चिटकवली जाते. जेव्हा हवे तेव्हा काढताही येते. सपोर्ट स्टाफमधील एका संगणकतज्ज्ञ व्यक्तीने मला ही चीप दिली आहे. त्यामुळे माझी टेनिस कोर्टवरील कामगिरी सुधारण्यास मदत होत आहे. हे माझ्या यशस्वी कारकिर्दीचे मोठे रहस्य आहे, असे जोकोविच म्हणाला.
महासंघ काय कारवाई करणार
जागतिक टेनिसमध्ये अशी बाह्य उपकरणे वापरण्याची परवानगी केवळ पंच किंवा रेफ्री यांनाच असते. त्यामुळे एखादा खेळाडू सामन्यादरम्यान अशी चीप वापरत असेल तर महासंघ काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. जोकोविचवर कारवाई होणार का, हादेखील एक प्रश्न निर्माण झाला आहे.