मुंबई – रिझर्व बॅंकेने व्याजदरात 0.40 टक्क्यांची वाढ केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आगामी वर्षांमध्ये घरांचे दर किमान साडेसात टक्क्यांनी वाढतील असे देशातील रिऍल्टी क्षेत्रातील विकासकांना वाटते.
किंबहुना बऱ्याच विकासकांनी अगोदरच घरांच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. व्याजदर वाढण्यात बरोबरच सिमेंट आणि पोलादाच्या किमती गेल्या काही महिन्यापासून वाढत होत्या. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेने 11 ते 27 मे दरम्यान देशातील 13 रिऍल्टी क्षेत्रातील विश्लेषकाशी चर्चा करून तयार केलेल्या अहवालानुसार आगामी काळात घरांच्या दरात वाढ होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येते.
यासंदर्भात जेएलएल या संस्थेचे संचालक रोहन शर्मा यांनी सांगितले की भारतामध्ये घरांची मागणी आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. करोनाच्या काळात मागणी तुंबली होती. आता व्याजदर वाढत आहेत. त्याचबरोबर घरांच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे विकासक दर वाढ करतील.
त्याचबरोबर आगामी काळात व्याजदरात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे स्वस्त किमतीत घरे घेण्याची शक्यता फक्त पुढील नऊ महिन्या पर्यंत टिकण्याची शक्यता आहे. पुढील दोन वर्षांमध्ये घरांच्या किमती वाढल्यानंतर परवडणारी घरे अधिक किमतीची होतील. त्यामुळे सध्याच्या पातळीवर घर खरेदी करणे ग्राहकांना परवडू शकते.
नाईट फ्रॅंक या संस्थेचे संचालक विवेक राठी यांनी सांगितले की व्याजदरात एका टक्का वाढ झाल्यानंतर घरांच्या किमतींमध्ये 7 टक्क्याची वाढ होण्याची शक्यता असते. रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ करून हे व्याजदर 6 टक्क्यांच्या वर नेल्यानंतर इतर क्षेत्राप्रमाणे घरांच्या निर्मिती आणि विक्रीवर आहे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.