रामदास बाणखेले : खासदार नसताना आढळरावांनी मोठा निधी आणला
मंचर : मंचर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील आणि भाजप सरकारने जवळपास गेल्या वर्षभरात 50 ते 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. प्रत्यक्षात कामे सुरू झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासह मंचरचा चेहरा बदलण्यासाठी आढळराव पाटील यांची नितांत गरज आहे. आढळराव पाटील यांनी स्वतः खासदार नसतानाही मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे यांच्या माध्यमातून विकासनिधी आणल्यामुळे मंचरकर खुश आहे. त्यामुळे त्यांच्याच मागे नेहमी मंचरकर उभे राहणार असल्याचे रामदास किसनराव बानखेले यांनी सांगितले.
मंचर येथील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी बांधव, शेतकरी आदींनी आढळराव पाटील यांना पाठिंबा दिला असल्याचे यावेळी भाजप नेते संजय थोरात यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले, वरिष्ठ नेते प्रमोद बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुहास बाणखेले, रामदास जाधव, जे. के. थोरात, योगेश बाणखेले आदी उपस्थित होते.
विरोधाला विरोध करणे आणि चांगल्या कामाला खोळंबा करणे यासाठी मंचरमधील काही विघ्न संतोषी माणसे कार्यरत आहे. त्यांच्यामागे जनाधार नाही. परंतु विरोध करण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या विचारांना थारा देऊ नका आणि आढळराव पाटलांसारख्या सज्जन माणसाच्या मागे उभे राहा, असे आवाहन भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व माजी उपसरपंच सुनील बाणखेले यांनी सांगितले.
वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांनी कधीही गुन्हेगारी किंवा चुकीच्या कामांना थारा दिला नाही. त्यामुळे सुसंस्कृत उमेदवार आढळराव पाटील यांच्या पाठीशी आम्ही असल्याचे अरुण लोंढे, व्ही. एस. महामुनी आणि सीताराम लोंढे यांनी सांगितले.
मंचरकरांच्या विकासाला बाधा आणण्यासाठी काहीजण केवळ राजकारण म्हणून आढळराव पाटील यांना पाण्यात पाहत आहे. हा प्रकार योग्य नाही जो विकास करतो त्याच्यामागे पाठीमागे ठामपणे उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
-देवेंद्र शहा, अध्यक्ष शरद सहकारी बँक
यांनीही दिला पाठिंबा
उमेदवार आढळराव पाटील यांना पाठिंबा देणार्यांमध्ये शेतकरी, मराठा, माळी, मुस्लिम समाजाचे मान्यवर, कुंभार, लोहार, कोष्टी, चर्मकार, यांच्यासह विविध जाती-धर्माच्या आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि मित्र पक्षातील मान्यवरांचा समावेश आसल्याचे मंचरचे माजी उपसरपंच धनेश मोरडे यांनी सांगितले.