मुंबई – मुंबई रिझर्व्ह बँकेने व्याजदरात बदल न करता तो 6.5% या पातळीवर कायम ठेवला. शेअर बाजारात बर्याच खरेदी-विक्रीच्या लाटा आल्यानंतर निर्देशांक अल्प प्रमाणात वाढले. आज झालेल्या खरेदीचा फायदा बँक आणि रिअॅल्टी क्षेत्राला जास्त झाला. व्याजदर उच्च पातळीवर कायम ठेवल्यामुळे बँकांची उलाढाल आणि नफा वाढू शकतो असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे बँकांच्या शेअरची खरेदी झाली.
त्याचबरोबर याचा फायदा रिअॅल्टी क्षेत्राला काही प्रमाणात होऊ शकतो असे काही गुंतवणूकदारांना वाटल्याने रिअॅल्टी क्षेत्रातील कंपन्याही आज तेजीत होत्या. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 20 अंकांनी वाढवून 74,248 या नव्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक केवळ एक अंकांने कमी होऊन 22,516 अंकावर बंद झाला.
रिअॅल्टी क्षेत्राचा निर्देशांक 108 अंकांनी म्हणजे 1.59 टक्क्यांनी वाढून 7,392 अंकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा बँकेक्स 451 अंकांनी म्हणजे 0.83 टक्क्यांनी वाढून 54,590 अंकावर बंद झाला. तर मुंबई शेअर बाजाराचा फायनान्शिअल सर्विसेस क्षेत्राचा निर्देशांक 97 अंकांनी वाढून 10,689 अंकावर बंद झाला.