पुणे – शासनाने खासगी रुग्णालयांना नियमानुसार बिले आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी खासगी हॉस्पिटलकडून जादा बिले आकारली जात आहे. मागील 20 दिवसांत शहरातील खासगी हॉस्पिटलने 110 रुग्णांच्या बिलामध्ये 51 लाख 29 हजार रुपयांचे जादा बिल समाविष्ट केल्याचे समोर आले. प्रशासनाकडे याप्रकरणी दाद मागितल्यानंतर खासगी रुग्णालयांनी वाढीव बिलाची रक्कम कमी केली.
करोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्याच्या गैरप्रकारला आळा बसण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सनी दिलेल्या दीड लाख रुपयांवरील रकमेच्या बिलांचे पूर्व तपासणी करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांबरोबरच ग्रामीण भागातील हॉस्पिटलसाठी बिलांचे लेखापरिक्षण करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली.
महापालिकेतील लेखा विभागातील अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली. दीड लाखांपेक्षा अधिकचे बिल हे हॉस्पिटलकडून लेखापरीक्षण पथकाला दिले जाते.
या बिलांचे तपासणी केल्यानंतर जादा दर आकारण्यात आले असतील, तर त्याबाबतचे म्हणणे रुग्णालयांकडून मागवले जाते. आकारलेले बिल योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ते बिल रुग्णांना अथवा नातेवाईकांना दिले जाते.