पुणे – पुणे महापालिकेने “सीएसआर’ फंडातून उभारलेल्या बाणेर-बालेवाडी येथील “डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’मध्येही, जम्बो हॉस्पिटलचीच पुनरावृत्ती झाली असून, तेही कुचकामी ठरले आहे. ज्या खाजगी हॉस्पिटलला हे काम दिले ते व्यवस्थापनही “फेल’ गेल्याने महापालिकेने त्वरित येथेही पर्यायी व्यवस्था सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील रूबी हॉल तथा अन्य हॉस्पिटलकडून याचे व्यवस्थापन करता येईल का, याची चाचपणी सध्या सुरू आहे
बाणेर येथे पीएमआरडीएच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेली “भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्यवस्थापन’ हे आवश्यक मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ पुरवण्यात “फेल’ गेले आहे. याठिकाणी नियोजित केलेले 314 बेड क्षमतेचे कोविड हॉस्पिटल उद्घाटन होऊन आठवडा उलटला, तरी केवळ 62 बेडच्या क्षमतेनेच सुरू आहे. यामध्ये 50 ऑक्सिजन बेड, 10 आयसीयू बेड आणि 2 व्हेंटिलेटर बेडवर सध्या रुग्ण आहेत.
विशेष म्हणजे या रुग्णांवर उपचार करण्यासाठीही हॉस्पिटल व्यवस्थापन कमी पडल्याने, महापालिकेने आपल्याकडील डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ पुरवला आहे.
पीएमआरडीच्या माध्यमातून निविदा काढून येथील व्यवस्थापनासाठी हॉस्पिटलची नेमणूक करण्यात आली. यात विविध बेडसाठी पुरवण्यात येणाऱ्या मेडिकल स्टाफसाठी 1200 रूपयांपासून दोन हजार रूपये प्रति बेड दररोज संबंधित हॉस्पिटलला दर महापालिकेकडून देण्यात येणार होता; परंतु आता त्यांचे काम काढून आहे त्याच बजेटमध्ये दुसऱ्या व्यवस्थापनाला नियुक्त करण्यात येणार आहे.
सध्या येथे खाजगी हॉस्पिटलच्या स्टाफसह बालेवाडी स्टेडियम येथे नियुक्त असलेले डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.