पुणे – जम्बो रुग्णालयाबद्दलच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट जम्बोतील उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत मंगळवारी वस्तुस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत जम्बोच्या परिस्थितीत सुधारणा होत असून येत्या दोन दिवसांत आणखी बेड उपलब्ध होणार आहेत.
जम्बो रुग्णालयाबद्दल गेल्या काही दिवसांत मोठ्या तक्रारी येत होत्या. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही, उपचारांमध्ये दिरंगाई होते आणि सुविधा मिळत नाहीत, असे तक्रारींचे स्वरूप होते. म्हणूनच जम्बो हॉस्पिटलची परिस्थिती नेमकी काय आहे? येथील यंत्रणा कशी आहे? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी महापौर मोहोळ यांनी थेट जम्बो रुग्णालयात आढावा घेऊन विविध सूचना केल्या.
आधीच्या एजन्सीचे काम काढून घेतल्यानंतर परिस्थिती बदलत असून समाधानाची स्थिती आहे. संबंधित एजन्सीवर कारवाईदेखील केली जाणार असून, नव्या एजन्सीची नेमणूक केली आहे.
जम्बोत आताच्या घडीला 178 रुग्ण उपचार घेत आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी 100 ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार असून, आयसीयू बेडची संख्या 60 पर्यंत नेण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू होत आहे. याबाबत विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही महापौरांनी सांगितले.