पोलीस कारवाई करण्याबाबतचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश
शिक्रापूर, दि. 20 (वार्ताहर)-सर्वत्र करोना महामारी सुरू असताना ग्रामीण भागात वेगळी पदवी प्रदान करून घेऊन अपूर्ण नोंदणीच्या आधारे हॉस्पिटल सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हॉस्पिटल चालकाच्या पदव्या तपासून कारवाई करण्याबाबतचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी शिरूर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका ठिकाणी हॉस्पिटल चालक डॉक्टर अहमदनगर येथून पदवी प्रदान करून घेत महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन मुंबई यांच्या आधारे हॉस्पिटल चालवत असल्याबाबतची काही नागरिकांनी तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर डॉ. पवार यांनी शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी यांना लेखी पत्र काढत शिक्रापूर येथील हॉस्पिटलची पदवी तपासणी करून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याबाबतचे आदेश दिले. या पत्रामध्ये शिक्रापूर येथील या हॉस्पिटलचालकाकडे असलेली पदवी ही बीएएमएस (एमए) तसेच सीएमएसईडी ही पदवी अहमदनगर येथून प्राप्त केली आहे. या हॉस्पिटलबाबत महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन मुंबई यांच्याकडे नोंदणी नसल्याचे म्हटले आहे.
- परस्पर विरोधी माहिती
याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी फिर्याद देण्यासाठी माणूस पाठवतो असे सांगितले; मात्र त्यांचा कोणीही माणूस फिर्याद देण्यासाठी आला नसल्याने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी या डॉक्टरवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे सांगितले.