पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्त्रियांच्या आयुष्यात ऋतुप्राप्ती हा काळ नवनिर्मितीच्या दृष्टीने जेवढा आनंददायी समजला जातो, तेवढाच खडतर काळ हा मेनोपॉजचा (पाळी बंद होणे) असतो. त्या वेळी होणारे हार्मोनल बदल हे स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक बदल घडवणारे ठरतात. अशा वेळी गर्भाशयच काढून टाकण्याचा विचार अनेक स्त्रिया करतात. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानातील संशोधनातून निर्माण झालेली हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही अशा महिलांसाठी वरदान ठरू शकेल अशी आहे.
पाळी बंद होताना असे होतेच, सहन करायचे, हिमोग्लोबिन कमी होतेच, अॅनिमिया हा महिलांच्या पाचवीला पुजलेलाच अशा अनेक चर्चा महिलांमध्ये पंचेचाळीशीनंतर सुरू होतात. हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यावर गोळ्या घेतल्या, तर त्याचे साइड इफेक्टस होऊन वजन वाढणे, मूड स्विंग्ज अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्याचीही महिलांची तयारी नसते.
त्यामुळे आता हार्माेन रिप्लेसमेंट थेरपीकडे महिला सकारात्मक दृष्टीने पाहू लागल्या आहेत. पूर्वी जेव्हा स्त्रिया तपासणीसाठी डाॅक्टरकडे जायच्या, तेव्हा प्राथमिक उपचारानंतर डाॅक्टर त्यांना फेरतपासणीचा सल्ला देत.
मात्र, बहुतांश महिलांकडून या सल्ल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसे. साहजिकच गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर उपचारासाठी पुन्हा येणाऱ्या महिलांवर विशिष्ट थेरपी वा ट्रिटमेंट करण्यास स्त्रीराेगतज्ज्ञ तयार हाेत नसत. आता काळ बदलला आहे. अनेक महिला स्वतःची काळजी घेण्यास स्वत:हून पुढे येत आहेत. त्यामुळे डॉक्टरसुद्धा आवश्यक असणाऱ्या महिलांना हार्माेन रिप्लेसमेंट थेरपीजसारख्या थेरपी वा ट्रिटमेंट घेण्यासाठी स्वत:हून शिफारस करतात. याला महिलांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
काय आहे ही थेरपी
या थेरपीअंतर्गत इन्स्ट्रोजिनची कमतरता भरून काढण्यासाठी बाहेरून इन्स्ट्रोजिनचा पुरवठा करणे शक्य असते. खायच्या गोळ्या, योनीमार्गात वापरायची क्रीम, त्वचेवर लावण्याची क्रीम, पॅच, इत्यादी अनेक प्रकारे इन्स्ट्रोजिन पुरवता येते. ज्या स्त्रियांचे गर्भाशय काही दोषांमुळे काढले आहे, त्यांना केवळ इन्स्ट्रोजिनयुक्त गोळ्या दिल्या जातात. ज्यांचे गर्भाशय अबाधित आहे, त्यांना इस्ट्रोजिन, तसेच प्रोजेस्टेरॉन यांचे विशिष्ट प्रमाण असलेल्या गोळ्या दिल्या जातात.
अस्थिभंगाचे प्रमाण कमी
प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशयाच्या अस्तराची होणारी अनिर्बंध वाढ रोखता येते. योनीमार्गाचे विकार असणाऱ्या स्त्रियांसाठी इस्ट्रोजिनयुक्त क्रीम उपयुक्त ठरते. रोज गोळ्या घेणे आवडत नसेल, पचत नसेल, तर त्वचेवर पॅच लावता येतो.
हा पॅच ठराविक दिवसांनी बदलावा लागतो. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी निदान पाच वर्षांपर्यंत घेतल्यास अस्थिभंगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होते. म्हणजेच दूरगामी फायद्यांसाठी हे उपचार दीर्घकाळ घेणे आवश्यक असते. मात्र, ही थेरपीची गरज ज्यांना आहे, त्यांनाच दिली जाते.