पुणे, {प्रभात वृत्तसेवा } – ससून रूग्णालयातील निवासी डाॅक्टरांचा संप सुरूच असून, आजही या संपावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान, या संपामुळे रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या उपचारामध्ये अडचणी येत असून, परिचारिकांवर कामाचा अधिक ताण आलेला आहे. ओपीडीची संख्याही कमी झाली असून, शस्त्रक्रिया पुढे ढकल्याण आले आहे.
ससून रूग्णालयात दररोज दीड ते दोन हजारच्या आसपास ओपीडी असते. मात्र, संपामुळे मागील तीन दिवसात ही संख्या निम्याने कामी झाली असून, आज रविवारी तर एक हजारपेक्षा कमी ओपीडी होती. संपात अत्यावश्यक सेवा आणि आयसीयुमध्ये डाॅक्टर उपलब्ध आहेत.
तसेच ससून रूग्णालय प्रशासनाकडून अतिरिक्त डाॅक्टर तैनात केल्यामुळे उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी काहीश्या कमी झाल्या. दरम्यान, निवासी डाॅक्टरांच्या मागण्याच्या प्रस्तावावर 25 फेब्रुवारीला निर्णय घेण्याचे अश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने संप जैसे थे सुरूच आहे.