पालिकेकडून 100 पथके तैनात; सोमवारपासून सुरू करणार तपासणी
नागरिकांनी सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन
पुणे -जगभरात करोनाची दहशत पसरल्यानंतर मागील महिनाभरात शहरात परदेशातून तब्बल साडेपाच हजार नागरिक आले. त्यांची माहिती विमानतळ प्राधिकरण आणि खासगी ट्रॅव्हल कंपन्यांकडून महापालिकेस उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, सोमवारपासून या सर्वांची घरोघरी जाऊन करोना संबंधित काही लक्षणे आहेत का तसेच त्यांची प्रकृती कशी आहे याची तपासणी होणार आहे. या कामासाठी तब्बल 100 पथके तयार केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
शहरात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह महापालिकेकडून या साथीला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रामुख्याने परदेशातून आलेल्या नागरिकांनाच आतापर्यंत या आजाराची लागण झाल्याने त्यांच्या तपासणीसाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत साथ नियंत्रणाचा एक भाग म्हणून शहरात गेल्या महिन्याभरात आलेल्या प्रवाशांची माहिती जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्राधिकरण आणि पर्यटन कंपन्यांकडे मागितली होती. त्यांच्याकडून या नागरिकांच्या पत्नीसह त्यांचे संपर्क क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती महापालिकेस उपलब्ध करून दिली आहे. या यादीत तब्बल साडेपाच हजार प्रवाशांचा समावेश आहे. त्यांना संपर्क करून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची तपासणी केली जाणार आहे.
त्यासाठी स्वतंत्र 100 पथके नेमली असून त्यात, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागासह इतर काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे कर्मचारी संबंधितांच्या घरी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी करतील तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना या आजाराची लक्षणे आहेत, असल्यास काय खबरदारी घ्यावी, त्यांना उपचार हवे आहेत का, घ्याचे असल्यास कोठे घ्यावे याबाबत मार्गदर्शनही करणार आहेत.
तर संबंधित प्रवासी घरीत विलगीकरणास तयार असल्यास जिल्हा प्रशासनाने निश्चित करून दिलेली नियमावली या प्रवाशांना दिली जाणार असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती महापालिकेस प्राप्त झाली आहे. ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असून या प्रवाशांची घरी जाऊन तपासणी करणे हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे महापालिकेचे पथक तपासणीसाठी आल्यानंतर प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, सहकार्य करावे, ही तपासणी त्यांच्या आरोग्यासाठी आणि शहरातील साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी असून नागरिकांनी सहकार्य करावे.
– रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त