पुणे – बाहेर देशातून आलेले विद्यार्थी, संशोधक सहायक विद्यापीठ अथवा महाविद्यालय वसतिगृहात राहात असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी संलग्नित महाविद्यालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करावेत, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत.
पुणे विद्यापीठाने यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले. बाहेर देशातून आलेले विद्यार्थी जर वसतिगृहात राहात असतील, त्याचे विलगीकरण विद्यापीठात अथवा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात, शैक्षणिक संस्थांमध्ये वेगळी इमारत अथवा जागा अशाप्रकारे निश्चित करावी. ज्यामुळे इतर विद्यार्थ्यांचा संपर्क अन्य विद्यार्थ्यांशी होणार नाही, याची जबाबदारी एखाद्या अधिकाऱ्यास देण्यात यावी. अशाप्रकारे विलगीकरण कक्ष स्थापन करावेत. त्यासाठी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी किंवा ग्रामीण भागामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या पर्यवेक्षकीय नियंत्रणाखाली ही कार्यवाही करावी. यापैकी काही व्यक्तींना करोना विषाणू प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्यास त्यांना नायडू हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात यावे, अशा सूचना संबंधितांच्या तत्काळ निदर्शनास आणून द्यावेत, असेही विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये देश व देशाबाहेरून वेगवेगळे विद्यार्थी येत असतात. करोना विषाणूचा प्रादुर्भाव देश व जगात पसरतो आहे. ते विचारात घेऊन दि. 15 मार्चनंतर बाहेरून देशातून आलेल्या व्यक्तींना कमीत कमी पंधरा दिवस स्वत:च्या घरामध्ये, जेथे ते राहत आहेत, तेथे विलगीकरण करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.