“वर्क फ्रॉम होम’ आणि पाल्यांकडे लक्ष देताना कसरत
पुणे – सुट्टी म्हंटलं की मनसोक्त खेळणे, फिरणे, सहलींना जाणे, कार्टून पाहणे अशी समीकरणे लहान मुलांच्या मनात असतात. मात्र, याला सध्या दूर ठेवावे लागत असल्याने “मुलांना व्यस्त कसे ठेवायचे’ हा “टास्क’ पालकांना पूर्ण करावा लागत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी दिली आहे आणि धास्तीने मुलांना घराबाहेर, विशेषत: समूहात खेळायला सोडायचे नाही, अशा दोन परस्परविरोधी परिस्थितीमध्ये पालकांचा कस लागत आहे. अनेक पालकांना एकीकडे “वर्क फ्रॉम होम’ आणि दुसरीकडे “पाल्यांकडे लक्ष देणे’ अशा दुहेरी जबाबदाऱ्या पेलाव्या लागत आहेत. सुट्टीच्या काळात नेहमी शिबिरे, हॉबी क्लासेसला पाठवणे, सहलीला जाणे, बागा, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे मुलांना दाखवणे असे नियोजन असायचे.
पण, करोनाच्या पार्श्वभूमीवर घरात मुलांना घरात कंटाळा न येऊ न देता, त्यांना रमवून ठेवण्यासाठी पालकांचे कौशल्य पणाला लागत आहे. सध्या छोटे खेळ खेळणे, भातुकली खेळणे, पुस्तके वाचणे, कलात्मक गोष्टी तयार करणे आदी गोष्टी मुले उत्साहाने करत आहेत.
याबरोबरीने अनेक मुले टीव्हीतील मालिकांमधील पात्रांचे अनुकरून करत, घरामध्ये मालिकांतील घटना हुबेहुब उभारत आहे. तर दुसरीकडे या कालावधीमध्ये घरातील टीव्हीवर नियंत्रण ठेवावे लागते. त्यामुळे सध्या वेळापत्रक करून एका ठराविक वेळेतच टीव्ही पाहण्यासाठी परवानगी देत असल्याचे पालक सांगतात.
या गोष्टी करू शकतात मुले
कागदापासून वस्तू तयार करणे
अभ्यासाशी निगडीत खेळ खेळणे
मातीच्या वस्तू तयार करणे
चित्र काढणे, रंगवणे, चित्रांमध्ये ठशांचा वापर करणे
घरातील छोटी कामे सांगणे (उदा. वस्तू नीट ठेवणे, केर काढणे, छोटी भांडी घासणे, आदी.)
भाज्या निवडणे, सोलणे
टेबल ऍरेंजमेंट
गॅस न वापरता पदार्थ करणे
बागकाम
टाकाऊतून टिकाऊ वस्तू करणे
पुस्तकांमधून टिप्पणी काढणे
नृत्य, नाट्य आणि गायन शिकवणे
सध्या सुट्टी असल्याने, मुलांना सातत्याने व्यस्त ठेवावे लागत आहे. प्रामुख्याने पाल्यांना “मोबाइल’, “टीव्ही’, “व्हिडिओ गेम्स’ अशा “स्क्रीन्स’पासून दूर ठेवावे लागत आहे. मुलांना विविध खेळ सुचवत आहोत. साध्या सोप्या खेळांमधून त्यांना अधिकाधिक गोष्टी कशा शिकवता येईल आणि घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये मुलांना कसे रमवता येईल, यासाठी पालकांनाच “क्ल्युप्त्या’ लढवाव्या लागत आहेत.
– वृषाली कुलकर्णी
“आपण घरी का आहोत’ हा प्रश्न सध्या मुलाला पडत आहे. त्यामुळे त्यांना करोनाबाबत आम्ही जागृतीपर माहिती सांगत आहोत. आपण घराबाहेर पडलो, तर काय अपाय होऊ शकतो, हे देखील सांगत आहोत. ही पिढी “शार्प’ असल्याने, त्यांच्या लक्षात येत आहेत. कंटाळाही न मुले रमण्यासाठी त्यांना अनेक खेळ, कलाकुसरीच्या वस्तू, घरातील छोटी कामे आदी शिकवत आहोत. जेणेकरून “एकाग्र’ होऊन त्यांनी विविध गोष्टी शिकता येतील. मुलांना असणाऱ्या मोकळ्या वेळामध्ये त्यांचे “खेळता खेळता शिक्षण’ कसे होईल, याकडे विशेष लक्ष देत आहोत.
– गंधाली बापट
विविध क्लासेस बंद आहेत, त्यामुळे सुट्ट्यांमुळे “रोज काय वेगळे करायचे’ असा प्रश्न नक्कीच पडतो. त्यामुळे थोडा अभ्यास घेणे, विविध कला आणि वस्तू तयार करणे आदी गोष्टी शिकवत आहोत. घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी करून घेत आहे. मुलांना करमण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरून विविध गोष्टी शिकवत आहोत. यासह टीव्ही पाहणे, काही वेळ खेळ असे सुरू आहे.
– अमृता दीक्षित