अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या बच्चन पांडे चित्रपटाला अखेर मुहूर्त सापडला आहे. हा चित्रपट १८ मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. यापूर्वी चित्रपट ४ मार्चला प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं वृत्त होत. मात्र आज निर्मात्यांनी चित्रपटाचे दोन नवे पोस्टर्स रिलीज करत चित्रपट १८ मार्चला प्रदर्शित करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली.
करोनामुळे लांबणीवर पडलेल्या बच्चन पांडे या चित्रपटाची अक्षय कुमारचे चाहते गेल्या दोन वर्षांपासून वाट पहात आहेत. अशातच आता हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याची खुशखबर अक्षयने चित्रपटाचे दोन पोस्टर पोस्ट करत दिली. अक्षयने पोस्ट केलेल्या या पोस्टर्समध्ये त्याचा चित्रपटातील ‘जबरदस्त’ लूक पाहायला मिळतोय.
एका पोस्टरमध्ये अक्षय कुमार वाढलेली दाढी, पाठीवर बंदूक व कोयत्यांनी भरलेली पिशवी, गळ्यात सोन्याच्या माळा घालून आकाशाकडे पाहताना दिसतोय. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये एका अक्षय हातात बंदूक घेऊन ट्रकच्या बॉनेटवर बसला आहे. त्याच्या मागे अनेक लोक हातात बंदुका व हत्यार घेऊन ट्रकवर उभी आहेत.
दरम्यान, या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असून त्याच्यासोबत क्रिती सेनन, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, प्रतिक बब्बर अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे.
साजिद नाडियादवालाचा ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले असून ‘एंटरटेनमेंट’, ‘हाऊसफुल ३’ आणि ‘हाऊसफुल ४’ नंतर अक्षयचा हा फरहादसोबतचा चौथा चित्रपट आहे.