प्रकार चव्हाट्यावर : 410 कोटींच्या जागेचे मूल्यांकन केले अवघे 157 कोटी रु.
पुणे – मेट्रो प्रकल्पात पुणे महापालिकेचीही भागीदारी आहे. त्यानुसार या सुमारे साडेअकरा हजार कोटींच्या प्रकल्पात पालिकेचा हिस्सा 951 कोटींचा आहे. हा खर्च मेट्रोला जागेच्या मोबदल्यात दिला जाणार आहे.
महापालिकेने मेट्रोला तब्बल 410 कोटी रुपये मूल्याच्या जागा हस्तांतरित केल्या असताना, महामेट्रोने त्याचे मूल्य अवघे 157 कोटी असल्याचे पालिकेस कळवत उर्वरित हिश्श्याची जागा तातडीने देण्याची मागणी केली होती. मात्र, मेट्रोचा हा डाव लक्षात येताच पालिका प्रशासनाने तातडीनं महामेट्रोला पत्र पाठवत जागांचे नेमके मूल्य कळवत मेट्रोला तंबी दिली आहे. तसेच पालिकेने निश्चित केलेले मूल्य अंतिम असून त्यानुसार मेट्रोने तातडीनं पालिकेच्या हिश्श्याची रक्कम सुधारित करून कळविण्याची सूचना दिली आहे.
पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी मार्गांच्या कामासाठी सुमारे 951 कोटींचा निधी महापालिकेने टप्प्याने तातडीन मेट्रोस उपलब्ध करून द्यावा, असे पत्र महामेट्रो वारंवार दिले आहे. महामेट्रोने सप्टेंबरमध्येही असे पत्र पाठवत पालिकेने आतापर्यंत दिलेल्या जागांचे मूल्यांकन 157 कोटी असल्याचे कळवले आहे. मात्र, मेट्रोने या जागांचे केलेले मूल्यांकन पालिकेने पुन्हा तपासले.
या वेळी मेट्रोने प्रकल्प 2015 मध्ये मंजूर झाल्याचे दाखवत त्या वर्षीच्या रेडीरेकनर दराने जागांचे मूल्य महापालिकेस न कळवताच निश्चित केले. तसेच त्याच मूल्याच्या आधारे पालिकेच्या हिश्श्यातून हा 157 कोटींचा निधी वजा करत उर्वरित 794 कोटींचा निधी जागांच्या तसेच निधीच्या स्वरूपात उपलब्ध करण्याची मागणी केली होती.
महापालिकेने हाणून पाडला डाव
महामेट्रोने जागांचे मूल्य 2015 च्या रेडीरेकनुसार करून पालिकेचा हिस्सा कमी दाखवल्याचा प्रकार लक्षात येताच महापालिकेच्या भूसंपादन विभागाने यावर आक्षेप घेतला. 2008 च्या जागावाटप नियमानुसार “जागा हस्तांतरित करताना अथवा भाडे कराराने देताना चालू रेडीरेकनरनुसारच दर असावा,’ अशी तरतूद आहे. तसेच जिल्हा प्रशासनानेही आपल्या जागा मेट्रोला देताना चालू वर्षाच्या रेडीरेकनर दराने महामेट्रोला दिल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यामुळे महापालिकेने महामेट्रोला हस्तांतरीत केलेल्या जागांचे मूल्य हे तब्बल 410 कोटी असल्याचे महामेट्रोला कळविले आहे. तसेच पूर्वी जमा दाखवलेली रक्कम 157 कोटींऐवजी 410 कोटी म्हणून महापालिकेच्या हिश्श्यात नमूद करून तसे पत्र सादर करावे, असे सूचना वजा आदेश महामेट्रोला दिले आहेत. –