खंडाळा तालुक्‍याला पावसाचा तडाखा

लोणंद – जिल्ह्यात काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या या पावसाने सोमवारी रात्री खडाळा तालुक्‍याला मात्र जोरदार तडाखा दिला आहे. रात्रभर पडणाऱ्या या जोरदार पावसामुळे तालुक्‍यातील अनेकठिकाणी पुल पाण्याखाली गेले आहेत तर काही ठिकाणी घरांमध्येही पाणी घुसण्याचे प्रकार घडला आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतीचेही चांगलेच नुकसान झाले आहे.

मान्सूनचा जोर संपताच काही दिवसांमध्येच परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. कधीनव्हे ते परतीचा पाऊस नोव्हेंबर उचकटला तरीही थांबायला तयार नाही. परतीच्या पावसामुळे माण-खटाव तालुक्‍यातही नद्या, ओढे, बंधारे भरुन वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रेंगाळलेल्या परतीच्या पावसाने सोमवारी रात्री खंडाळा तालुक्‍यालाही जोरदार तडाखा दिला आहे. विजांच्या कडकडासह झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

गावागावांतील पूल पाण्याखाली गेले असून शेतातही पाणी साठून पिकांचे मोठे नुकसान झाले.
रात्रभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने लोणंद येथील खेमावती नदीला पूर आल्याने माळी आळी येथील श्री म्हस्कोबानाथ मंदिरासमोरील पूल, लोणंद – शिरवळ रोडवरील पूल, पाडेगावचे सरदेच्या ओढ्यावरील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने मंगळवारी दिवसभर याठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. तर काही ठिकाणी लोकवस्तीतही पावसाचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मोर्वे येथील पूल देखील पाण्याखाली गेला होता तर सर्वत्र शेतात पाणी साठले होते. खेड बुद्रुक गावातील पूलही पाण्याखाली गेला होता. खंडाळा मंडलात सर्वाधिक 114.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात खंडाळा तालुक्‍यातील खंडाळा येथे 114.6 मिमी, वाठार बुद्रुक येथे 136 मिमी, लोणंद येथे 64 मिमी, शिरवळ येथे 22.4 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.