तब्बल ३० लाखांना गंडा : एकास अटक, पोलीस कोठडी
पुणे – पोलीस भरतीच्या आमिषाने 20 मुलांची तब्बल 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीते ठेवण्याचा आदेश दिला.
विवेक विष्णू पंचरास (वय 32, रा. लोणी, ता. आंबेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत किसन निवृत्ती शिंदे (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे. 15 डिसेंबर 2013 ते 2014 या कालावधीत ही घटना घडली.
शिंदे यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या ओळखीच्या अशा 20 जणांना पोलीस म्हणून भरती करून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. भरती करण्यासाठी आरोपींनी प्रत्येकाकडून 1 लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना नोकरी न लावता त्यांची 30 लाख रुपयांची फसवणूक केली. घेतलेले पैसे परत मागितले असात त्यांनी शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच, आरोपींनी शिंदे यांच्यासह इतरांना तत्कालीन गृहमंत्री यांची सही असलेले बनावट पत्र दिले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पंचरास याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली.