कोल्हापुरात रंगला कलगितुरा
कोल्हापूर – जागतिक फुटबॉलमध्ये ज्या प्रकारे दोन मोठ्या संघाचे चाहते एकमेकांना भिडतात तोच प्रकार आता क्रिकेटमध्येही घडला. हिटमॅन रोहित शर्मा व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या चाहत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर कोल्हापुरातील कुरुंदवाड येथे धोनीच्या चाहत्यांनी सर्व ठिकाणी त्याची पोस्टर्स लावली होती. त्यानंतर रोहितला खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानंतर रोहितच्या चाहत्यांनीही त्याची काही पोस्टर्स लावली. त्यानंतर काही जणांनी रोहितची लावलेली पोस्टर्स काढून टाकली. त्यामुळे रोहितचे चाहते चांगलेच खवळले होते. काही अज्ञात लोकांनी रोहितचे पोस्टर्स काढले असले तरी त्याच्या चाहत्यांना हे काम कोणी केले, हे समजले. त्यांनी धोनीच्या चाहत्यांना याबाबत जाब विचारायला सुरुवात केली आणि त्यानंतर बाचाबाची सुरू झाली.
एका वाहिनीने हे वृत्त दिले आहे. या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांनी एकमेकांना शिवीगाळ व मारहाण केल्याचेही बोलले जात आहे. हे दोन्ही खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र असले तरी त्यांच्यावरून चाहत्यांमध्ये मात्र अत्यंत रोष निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.