ग्रामपंचायतीची सर्व यंत्रणा करोना उपाययोजनांत गुंतल्याने काम थांबले
पुणे – राज्य शासनाने हाती घेतलेल्या गावठाणांची मोजणी प्रकल्पाला करोनाचा फटका बसला आहे. ग्रामपंचायतीची सर्व यंत्रणा करोना उपाययोजनांत गुंतल्याने जिल्ह्यातील गावठाणांची मोजणीचे काम थांबले आहे. सद्य:स्थितीत 200 गावठाणांची मोजणी झाली असून उर्वरित 1 हजार 200 गावठाणांची मोजणी येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचा निश्चय भूमि अभिलेख विभागाने केला होता. मात्र, करोनामुळे या प्रकल्पाला ब्रेक लागला आहे.
गावाची वाढती लोकसंख्या, विकासाच्या निरनिराळ्या योजनांमुळे गावात भौगोलिक बदल होत असून जमीन हस्तांतरण प्रक्रिया वेगाने होत आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील बांधकाम परवाने देण्याचे अधिकार योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी जागेचा नकाशा व गावठाणाचे भूमापन असणे आवश्यक आहे. मात्र, ग्रामीण भागात गावठाणाचे अभिलेख नसल्यामुळे नेमकी जागा किती आहे, याबाबत सुस्पष्टता नसते. तसेच मालमत्तेचे मालकीपत्र नसल्यामुळे आर्थिक पतही निर्माण होत नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करून जमीन मोजणी करण्यात येते. राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला. या सुविधेमुळे सर्वसाधारण पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात.
मात्र, ड्रोनच्या सहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते. जानेवारी महिन्यात दीड वर्षात जिल्ह्यातील सर्व गावठाणांची मोजणी करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. गावठाण मोजणीसाठी ग्रामपंचायत आणि गावातील नागरिक यांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. मात्र, करोनामुळे सर्व यंत्रणा त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या कामात गुंतली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता लांबणीवर पडणार आहे.