मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते प्रकाश राज अभिनयासह त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त करतात. अनेकदा त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. यावेळी प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी मोदींची तुलना थेट हिटलरसोबत केली आहे.
प्रकाश राज यांनी ट्वीटरवर मोदींचा आणि हिटलरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासमोर लहान मुलं दिसत आहेत. मुलं आणि मोदी यांच्यामध्ये एक काटेरी तार आहे. या फोटोसोबत प्रकाश राज यांनी हिटलरचाही फोटो पोस्ट केला आहे. हिटलरलाही अशाच प्रकारचा हा फोटो दिसत आहे. हिटलरसमोर काही लहान मुलं आहेत आणि त्यांच्या मध्ये काटेरी तार आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, ‘इतिहासाची पुनरावृत्ती होते.. भविष्य या काटेरी तारांच्या मागे आहे.. आताच सावध व्हा!’ असे म्हणत प्रकाश राज यांनी मोदी समर्थकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
History repeats..Future is behind the Barbed wire .. BEWARE..ಇತಿಹಾಸ ಮರುಕಳಿಸುತ್ತಿದೆ .. ಭವಿಷ್ಯ ಮುಳ್ಳು ತಂತಿಯ ಹಿಂದಿದೆ . ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಿ #justasking pic.twitter.com/5awaJs6ywe
— Prakash Raj (@prakashraaj) May 4, 2023
दरम्यान, यापूर्वीही प्रकाश राज यांनी मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीवरून प्रकाश राज यांनी ट्वीट करत मोदींना त्यांची पदवी दाखविण्यास सांगितले होते. अनेकदा प्रकाश राज मोदी सरकावर निशाणा साधत काही मुद्यांकडे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. यामुळे ते मोदी समर्थकांकडून ट्रोलही होत असतात.
नुकत्याच पोस्ट केलेल्या या पोस्टवरून देखील नेटकरी ‘हिटलरचा आणि समोर असलेल्या मुलांचा फोटो एडिट केला आहे,’ ‘ हिटलरच्या समोर उभी असलेली मुले उदास तर मोदींच्या समोरील मुले आनंदी आहेत’, अशा प्रतिक्रिया देत आहेत.