बंडखोरीचा इतिहास असणाऱ्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये

ओहोळ यांनीच राजीनामा द्यावा; विखे समर्थकांची मागणी

संगमनेर -लोकसभा निवडणुकीत आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या बाबा ओहोळ यांच्यासारख्या निष्क्रीय अध्यक्षाने पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत, ज्यांचा इतिहासच बंडखोरीचा आहे. त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही. ज्यांच्या कारकीर्दीत तालुक्‍यात पक्षाची वाताहात झाली. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी संगमनेर तालुक्‍यातील विखे समर्थक कार्यकर्त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

कॉंग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी शालिनी विखे पाटील यांनी पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात केलेल्या मागणीचा समाचार घेताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख, संगमनेर मर्चंट्‌स बॅकेचे माजी संचालक किशोर नावंदर आणि डॉ. सोमनाथ कानवडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विखे पाटील यांना पदावर ठेवायचे की नाही हा सर्वस्वी अधिकार पक्षनेत्यांचा आहे.

पण ज्या विषयावर बोलण्याचाही अधिकार नाही. अशा विषयाची पत्रकबाजी करून ओहोळ यांनी स्वतःचे हसू करून घेतले आहे. ज्यांना स्वतःच्या गावची ग्रामपंचायत देखील सांभळता आली नाही. त्यांनी विखे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी ही फक्त व्यक्तिद्वेषापोटी आणि वैफल्यग्रस्त भावनेतून केली आहे.

तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी असताना ओहोळ यांनी कॉंग्रेस पक्ष “यशोधन’ मध्ये अडकवून ठेवला. तालुक्‍यात कोणतेही संघटन उभे न करता केवळ ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक यांच्या दावणीला पक्ष बांधला. याचाच परिणाम मागील विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या नेत्याचे मताधिक्‍य घटले. याची सुध्दा जाणीव ओहोळ यांना राहिली नाही. लोकसभा निवडणुकीत आ. कांबळे यांच्या विजयाची जबाबदारी “संगमनेरने’ घेतली होती. परंतू संगमनेर तालुक्‍यातूनच आ. कांबळे यांना ओहोळ मताधिक्‍य देवू शकले नाहीत.

आ. कांबळे यांना शेजारच्या अकोले तालुक्‍यातून मताधिक्‍य मिळते, मग संगमनेर तालुक्‍यात सर्व सतास्थाने ताब्यात असताना सुध्दा कॉंग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळू शकत नाही याचे आत्मपरिक्षण ओहोळ यांनी करावे असा सल्लाही पत्रकातून देण्यात आला आहे. त्यामुळे ओहोळ यांनीच पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी करून, स्वतःच्या पक्षाशी प्रामाणिक नाहीत आणि स्वतःच्या नेतृत्वा विरोधात बंडखोरी करण्याचा ज्यांचा इतिहास आहे, त्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नयेत, असे पत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.