पुणे – डॉक्‍टरांच्या समुपदेशनासाठी केंद्रे सुरू करा

आयएमएची मागणी : मानसिक तणावाचे आव्हान हाताळण्याचा सुरू केला उपक्रम

पुणे – “इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि डॉक्‍टरांमधील मानसिक तणावाचे आव्हान हाताळण्यासाठी मार्गदर्शन करणारा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे “डॉक्‍टर्स फॉर डॉक्‍टर्स’ असे नामकरण करण्यात आले आहे. “आयएमए’ने सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये 247 काऊन्सेलिंग सेंटर्स सुरू करण्याची मागणी केली आहे.

स्व-मदतीचे प्रशिक्षण देणार
या उपक्रमाद्वारे आम्ही कामाच्या तणावामुळे मानसिक उर्जा नष्ट होणे (बर्न आउट) मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधणे, निवासी आणि डॉक्‍टरांमधील आत्महत्येचे प्रकार रोखणे इत्यादी गोष्टींवर प्रतिबंध आणण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. समस्येसंदर्भात जागरूकता निर्माण करत आणि भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्‍यक साधने वापरत आम्ही हे साध्य करणार आहोत. आम्ही स्व-मदतीचे प्रशिक्षण देणार असून गरजूंना डी-4-डी ची मोफत हेल्पलाइन पुरवणार आहोत, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सांतनू सेन यांनी सांगितले.

डॉक्‍टर्सनी काळजी घ्यावी
डॉक्‍टर्सनी सर्व डॉक्‍टर्सची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये नैराश्‍य आणि आत्महत्येचा धोका वाढत असल्याचे जागतिक चित्र दिसताना डॉक्‍टर्संनी स्वतःची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे झाले असल्याचे प्रमुख संस्था आणि डॉक्‍टर्सची सर्वात मोठी संघटना या नात्याने आयएमएला वाटते. वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्‍टर्समध्ये जागतिक पातळीवर हा धोका 2.5 पटींनी वाढला असून 24 ते 37 वर्ष वयोगटातील व्यावसायिकांना जास्त धोका आहे. भारतातील चिकित्सकांमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी 45 टक्‍के जणांची भावनिक दमणूक सर्वोच्च होती, तर 87 टक्‍के डॉक्‍टर्स वैयक्तिक ध्येय साकारण्याच्या बाबतीत निचांकी पातळीवर होते. उच्च तणाव आणि जोखमीखाली काम करणाऱ्यांना आत्महत्या आणि मानसिक उर्जा नष्ट होण्याचा धोका संभवत असून, आपत्कालीन विभाग, प्रसूती विभाग, मानसोपचार, इंटेन्सिव्हिस्ट्‌स (आयसीयू डॉक्‍टर्स) आणि भूलतज्ज्ञ या विभागांतील तज्ज्ञांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो.

डीफॉरडी हा अभिनव उपक्रम
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आयएमएने डॉक्‍टर्स फॉर डॉक्‍टर्स (डीफॉरडी) हा अभिनव उपक्रम लॉंच केला असून त्यामागे वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि चिकित्सकांमधील मानसिक आरोग्यासमोरील आव्हानांचे वाढते प्रमाण हाताळण्याचा हेतू आहे. डीफॉरडीद्वारे शारीरिक दमणूक आणि मानसिक आरोग्य या बाबी धोरण आणि प्रशिक्षणांत बदल करून संपूर्ण यंत्रणेमध्ये हाताळल्या जाणार आहेत. याद्वारे वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि डॉक्‍टरांमध्ये मानसिक स्वास्थ्य, स्थिर तसेच जुळवून घेण्याची वृत्ती रूजवली जाईल, अशी माहिती भारतातील वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्‍टर्सचे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी काम करणारी आयएमए राष्ट्रीय समितीच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा कदाम्बी यांनी दिली. आयएमए डीफॉरडी टीमने याआधीच बेंगळुरू, पुणे, दिल्ली, सूरत आणि कोचीन येथे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी भावनिक स्वास्थ्य आणि दमणुकीबाबत जागरूकता आणि स्व-मदत कार्यशाळा घेतल्या आहेत.

व्यावसायिक काऊन्सेलिंगही पुरवले जाणार
सध्या आयएमए निवासी डॉक्‍टर्स आणि चिकित्सकांचे हिंसेविरोधात रक्षण करण्यासाठी, कनिष्ठ तसेच निवासी डॉक्‍टर्ससाठी चांगले जीवनमान आणि काम करण्याच्या सोयी, योग्य एचआर मार्गदर्शक तत्त्वे, कडक कागदपत्र प्रक्रिया, कॅम्पसवरील रॅगिंग, धमक्‍या, लैंगिक अत्याचार तसेच सामाजिक भेदभाव इत्यादींविरोधात संरक्षण पुरवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तो आणखी बळकट करण्यासाठी काम करत आहे. डीफॉरडीच्या या उपक्रमाद्वारे वेळेवर सहाय्य तसेच सहज उपलब्ध होणारे व्यावसायिक काऊन्सेलिंगही पुरवले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.